मोफत पिशवीसाठीही पैसे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

अत्यल्प किमतीच्या कापडी पिशव्यांसाठी मिठाई दुकानांपासून मॉलपर्यंत दहा ते अठरा रुपये घेतले जातात. जेमतेम आठ दिवस टिकेल असा दर्जा असणाऱ्या पिशव्या ग्राहकांना देताना बिलात त्याची किंमत दाखवली जात नाही.

पिंपरी - अत्यल्प किमतीच्या कापडी पिशव्यांसाठी मिठाई दुकानांपासून मॉलपर्यंत दहा ते अठरा रुपये घेतले जातात. जेमतेम आठ दिवस टिकेल असा दर्जा असणाऱ्या पिशव्या ग्राहकांना देताना बिलात त्याची किंमत दाखवली जात नाही. विशिष्ट मायक्रॉनपर्यंतच्या प्लॅस्टिक कॅरीबॅगना बंदी घातल्यानंतर दुकानदार आता कापडी पिशव्या ठेवत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात सात मोठे मॉल आहेत. त्याशिवाय सुपर मार्केटची, दुकानांची संख्याही मोठी आहे. येथे खरेदी केल्यानंतर कापडी पिशव्यांमध्ये साहित्य दिले जाते. अतिशय पातळ व काही दिवसच वापरता येतील अशा या पिशव्या पहिल्या धुण्यातच फाटून किंवा विरून जातात. घाऊक पद्धतीने त्या घेऊन त्यावर आपल्या दुकानाचे नाव, पत्ता छापले जातात. दुकानात जाताना सर्वच ग्राहक पिशव्या घेऊन जातील असे नाही. त्या वेळी अशा पिशव्या घेतल्या जातात.

एरवी बाजारात आकारमानानुसार ही पिशवी तीन ते पाच रुपयाला मिळते. मात्र दुकानापासून मॉलपर्यंतच्या ठिकाणी या पिशव्या जादा किंमत आकारून ग्राहकांच्या माथी मारल्या जात आहेत. एकूण बिल रकमेत मात्र त्याची किंमत दर्शविली जात नाही.

हेही वाचा  : मृत्यू झालेल्या कर्जदाराचे कर्ज माफ

पांढरी पिशवी १८ रुपयांना
चिंचवडमधील नामांकित मॉलमध्ये हिरवी पट्टी लावलेली पांढऱ्या रंगाची पिशवी १८ रुपयांना आहे. येथील दुसऱ्या मॉलमध्ये लाल रंगाची कागदी पिशवी दहा रुपयांना दिली जाते. त्या शेजारी लागून असलेल्या मॉलमध्ये सामानाच्या आकारानुसार आठ रुपयांपासून बारा रुपयांना पिशवी मिळते. पिंपळेसौदागर येथील मॉलमध्येही बारा रुपये घेतले जातात. निगडी व पिंपरी-चिंचवड लिंक रस्त्यावरील प्रसिद्ध स्वीट मार्टमध्येही कागदी पिशवीसाठी दहा रुपये आकारले जातात. त्यावर जाहिरात केली आहे. कपड्याच्या शोरूममध्ये कापडी बॅग सात रुपयाला विकली जाते, असे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत दिसून आले.

कायद्यानुसार दुकान चालकांनी पिशवी मोफत देणे आवश्‍यक आहे. तिचा दर्जा चांगला असावा, तसेच ती प्रिंटेड व जाहिरातबाजी केलेली नसावी. जास्तीत जास्त दोन ते तीन रुपये किंमत दुकानदार आकारू शकतो. खराब दर्जा असूनही किंमत आकारत असेल, तर ग्राहकाला न्यायालयात दाद मागता येते.
- विजय सगर,  अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अध्यक्ष, पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: money for a free bag in pimpri