सावकाराने कर्जदाराच्या पत्नी व मुलीला वाईट कामाला लावण्याची दिली धमकी | Money Lender | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime
सावकाराने कर्जदाराच्या पत्नी व मुलीला वाईट कामाला लावण्याची दिली धमकी

सावकाराने कर्जदाराच्या पत्नी व मुलीला वाईट कामाला लावण्याची दिली धमकी

पुणे - व्यवसायवाढीसाठी २० ते २२ लाख रुपयांचे कर्ज घेऊन त्याबदल्यात तब्बल एक कोटी रुपयांची परतफेड केल्यानंतरही बेकायदा सावकारी करणाऱ्यांनी कर्जदाराची पत्नी आणि मुलीला वाईट कामाला लावण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी तिघांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

राजेंद्र देवेंद्र, राजेश राजेंद्र आणि राजू ऊर्फ जॉन राजेंद्र देवेंद्र (रा. मंगळवार पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सोलापूर बाजार येथे राहणाऱ्या ३९ वर्षाच्या व्यावसायिकाने याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र देवेंद्र यांच्याकडे सावकारी व्यवसायाचा कोणताही परवाना नाही. मात्र त्यांनी फिर्यादी यांना व्यवसायासाठी २०१२ मध्ये दाम दुप्पट व्याजाने कर्ज दिले. वेळोवेळी त्यांनी २० ते २२ लाख रुपये दिले. त्याबदल्यात फिर्यादी यांनी मुद्दल व व्याजापोटी आतापर्यंत एक कोटी रुपये परत केले.

मात्र तरीही आरोपी सातत्याने पैसे मागत होते. पैसे दिले नाही म्हणून शिवीगाळ करून फिर्यादी याची पत्नी व मुलीच्या नावाने धमकी दिली. त्यांच्या या त्रासाला कंटाळून त्यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

loading image
go to top