मुलाच्या उपचारांसाठीच्या पैशांवर चोराचा डल्ला

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 February 2020

मुलगा मृत्यूशी झुंज देतोय, त्याच्या शस्त्रक्रियेसाठी बापाने अनेकांचे उंबरठे झिजवून काही रक्कम जमा केली. ही रक्कम रुग्णालयात भरण्यासाठी जात असतानाच पीएमपीमध्ये चोरट्याने डल्ला मारला. हे लक्षात येताच बाप अक्षरश: ढासळला. तरीही, त्यातून सावरत पाठलाग करून त्याला पकडले. त्याचा प्रतिकार करीत जखडून ठेवले. पिंपरी पोलिसांना कळविल्यानंतर त्यांनी चोरट्याला ताब्यात घेतले.

पिंपरी - मुलगा मृत्यूशी झुंज देतोय, त्याच्या शस्त्रक्रियेसाठी बापाने अनेकांचे उंबरठे झिजवून काही रक्कम जमा केली. ही रक्कम रुग्णालयात भरण्यासाठी जात असतानाच पीएमपीमध्ये चोरट्याने डल्ला मारला. हे लक्षात येताच बाप अक्षरश: ढासळला. तरीही, त्यातून सावरत पाठलाग करून त्याला पकडले. त्याचा प्रतिकार करीत जखडून ठेवले. पिंपरी पोलिसांना कळविल्यानंतर त्यांनी चोरट्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्‍या दाखविताच त्याने चोरीची कबुली दिली. चोरीला गेलेली रक्कम पुन्हा मिळाल्यास मुलावर उपचार होतील, या आशेने आर्थिक मदतीसाठी वणवण हिंडणाऱ्या ‘त्या’ बापाला काहीसा आधार मिळाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुभाष मोतीराम चव्हाण (वय ४९, रा. चिखली) यांचा मुलगा समीर (वय २७) याला मेंदूमधील रक्तवाहिनीमध्ये जाळीची गाठ (ईव्हीएम) असल्याचे काही महिन्यांपूर्वी निदान झाले. त्यावरील उपचारासाठी येणारा खर्च ऐकून चव्हाण यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तरीही, मुलाचा जीव वाचविण्यासाठी दिवस-रात्र एक करीत दारोदारी वणवण हिंडून त्यांनी शस्त्रक्रियेसाठी पैसे जमा केले. राहते घर विकले. घरातील टीव्ही, भांडी विकण्याची वेळ त्यांच्यावर आली. यातून पहिली शस्त्रक्रिया झाली.

मात्र, काही दिवसांतच पुन्हा आणखी एक शस्त्रक्रिया करण्यास डॉक्‍टरांनी सांगितले. मात्र, पैसे नसल्याने मदतीसाठी चव्हाण यांनी ‘सकाळ’कडे कैफियत मांडली. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध करताच मदतीचा ओघ सुरू झाला. यामध्ये दुसरीही शस्त्रक्रिया झाली. आता सर्व ठीक होईल, असे वाटत असतानाच डॉक्‍टरांनी आणखी एक शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. यासाठीही लाखो रुपयांचा खर्च असून, समीरवर कासारवाडीतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी (ता. १०) मोशीतील एका नगरसेवकासह परिसरातील नागरिकांनी केलेल्या मदतीने १९ हजार ५०० रुपये चव्हाण यांच्याकडे जमा झाले होते.

ही रक्कम रुग्णालयात भरण्यासाठी चव्हाण पिंपरीतील वल्लभनगर येथून पीएमपी बसने जात असतानाच संतोष तिपण्णा गायकवाड (वय ३४, रा. मुंढवा) या चोरट्याने चव्हाण यांच्याकडील १८ हजारांची रोकड चोरली. ही बाब वाहकाच्या लक्षात आल्याने त्यांनी कोणाचे पैसे चोरीला गेले आहेत का? अशी विचारणा प्रवाशांकडे केली. त्या वेळी चव्हाण यांना आपले पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आले. तोपर्यंत गायकवाड बसमधून खाली उतरला होता. त्यापाठोपाठ चव्हाण यांनीही बसमधून उडी घेत गायकवाडला पकडले. पैशांबाबत विचारणा केली मात्र त्याने आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगत चव्हाण यांच्याशी झटापट केली. मात्र, तरीही चव्हाण यांनी चोरट्याला जखडून ठेवत पोलिसांना कळविले.

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आरोपीला संत तुकारामनगर चौकीत आणले. त्या ठिकाणी चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. तेथून आरोपीला पिंपरी पोलिस ठाण्यात आणले. येथे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद वाघमारे व निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे यांनी या प्रकरणात लक्ष घालून कर्मचाऱ्यांना तातडीने सूचना देत तपास केला असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. चव्हाण यांच्याकडील पैसे चोरल्याचे सांगून ही रक्कम त्याचा मित्र विशाल अंबादास जाधव (वय २५, रा. मुंढवा) याच्याकडे दिल्याचे सांगितले. दरम्यान, या प्रकरणात गायकवाड व जाधव या दोघांवर गुन्हा दाखल करून गायकवाडला अटक केली असून, जाधव अद्याप फरार आहे. मंगळवारी (ता. ११) गायकवाडला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Money theft by thief crime