मॉन्सूनचे प्रवाह सुरळीत होऊ लागले...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली आहे. काेकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून, मध्य महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भातही पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. राज्यात आजपासून (ता. 21) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शनिवारपासून (ता. 23) राज्यात सर्वत्र पाऊस सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून, मध्य महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भातही पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. राज्यात आजपासून (ता. 21) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शनिवारपासून (ता. 23) राज्यात सर्वत्र पाऊस सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

दक्षिण कोकण आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 4.5 किलोमीटर उंचीवर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती, महाराष्ट्रापासून केरळ किनाऱ्यापर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा यामुळे किनारपट्टीलगतच्या भागात ढगांनी गर्दी केली आहे. राज्यातही दुपारनंतर ढग जमा होऊन पाऊस पडत आहे. आजपासून (गुरुवार) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

मॉन्सूनचे प्रवाह सुरळीत होऊ लागल्याने शनिवारपासून (ता. 23) राज्यात सर्वदूर पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. मंगळवारी तळ कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. देवगड, मालवण, वेंगुर्ला, सांवतवाडी, कुडाळ येथे अतिवृष्टी झाली. तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नगर, सातारा, नाशिक, पुणे, माठवाड्यातील बीड, औरंगाबाद जिल्ह्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरू असून, बुधवारी (ता. 20) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये मध्यमहाराष्ट्रातील जळगाव येथे उच्चांकी 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे 33.0, नगर 35.2, जळगाव 40.2, कोल्हापूर 29.1, महाबळेश्वर 22.7, मालेगाव 39.4, नाशिक 34.8, सांगली 30.4, सातारा 32.1, सोलापूर 35.4, मुंबई 33.0, अलिबाग 31.0, रत्नागिरी 28.8, डहाणू 33.9, औरंगाबाद 35.5, परभणी 36.1, नांदेड 35.0, अकोला 38.0, अमरावती 37.8, बुलडाणा 35.2, ब्रह्मपुरी 40.1, चंद्रपूर 39.0, गोंदिया 37.8, नागपूर 37.0, वर्धा 38.5, यवतमाळ 35.5. 

बुधवारी (ता. 20) सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्रोत - हवामान विभाग) : 

  • कोकण विभाग : देवगड 270, मालवण 190, वेंगुर्ला 170, सावंतवाडी 150, कुडाळ 110, कणकवली 70, दोडामार्ग 60, राजापूर 60, राजापूर 20.
  • मध्य महाराष्ट्र : चोपडा 90, संगमनेर, कोरेगाव प्रत्येकी 50, अकोले, राहता प्रत्येकी 40, चाळीसगाव, कोपरगाव प्रत्येकी 30, जामनेर, पाचोरा, बागलाण, श्रीरामपूर, सिन्नर, गगणबावडा प्रत्येकी 20. 
  • मराठवाडा : बीड 40, फुलांब्री, शेगाव, हादगाव प्रत्येकी 30, वैजापूर, कन्नड, पूर्णा प्रत्येकी 20.
  • विदर्भ : देवरी, सडक अर्जुनी प्रत्येकी 20. 

मॉन्सूनसाठी पोषक हवामान 
गेल्या काही दिवसांपासून वाटचाल थांबलेल्या मॉन्सूनची वाटचाल पुन्हा सुरू होण्यासाठी पोषक हवामान तयार होत आहे. विषुववृत्ताकडून येणारे वाऱ्यांचे प्रवाह सुरळीत होऊ लागले असून, शनिवारनंतर (ता. 23) महाराष्ट्रासह देशाच्या पूर्व भागात मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ठाणे, नगर, बुलडाणा, अमरावती, गोंदियापर्यंत मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. राज्याच्या विविध भागांतही पाऊस सक्रिय होऊ लागल्याने मॉन्सूनच्या वाटचालीसाठी सुचक संकेत मिळू लागले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monsoon Flow Becoming Normal In Maharashtra