बळीराजाने शेतातच उभारले लाडक्या बैलाचे मंदिर...

सुषमा पाटील 
Tuesday, 15 September 2020


"हिंद केसरी' किताब पटकाविणाऱ्या बैलाचे खराडीतील शेतकऱ्याने उभारले स्मारक 

रामवाडी (पुणे) :  एखाद्या घरातील सदस्याप्रमाणे त्याला आम्ही वाढवले, तो आज सोडून गेला, त्याच्या स्मरणार्थ शेतामध्ये त्याचे स्मारक उभारले. ज्याच्यामुळे पुणे जिल्ह्यात गावोगावी आमच्या कुटुंबाचे नाव झाले तो माझा "संजय बैल' या जगातून निघून गेला. ,दशक्रिया विधी केला, पिंड पाडले! हे सांगताना खराडीतील शेतकऱ्याचा कंठ दाटून आला!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खराडी गावातील रहिवासी कांताराम दत्तोबा पठारे यांनी अहमदनगर - पठारवाडी येथून खिलारी जातीचा एक वर्षाचा बैल खरेदी केला, त्याचे प्रेमाने संजय नाव ठेवले. पौष्टिक खुराक खाऊ घालून त्याला तगडा बनवला, जिल्ह्यातील अनेक गावांत बैलगाडा स्पर्धेत त्याने बक्षिसे मिळवून दिली. फुलगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने बैलगाडी स्पर्धा घेण्यात आल्या, त्यात संजयने "हिंद केसरी किताब' व ट्रॅक्‍टर बक्षीस मिळवून दिले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

2013 पासून बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आली. काहींनी आपले बैल विकले, पण कांताराम पठारे हे मात्र अपवाद ठरले. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे घरात सर्वांना दुःख झाले. एखादा व्यक्ती गेल्यावर ज्या धार्मिक विधी करतात, ते सर्व विधी संजय बैलाच्या पार पाडल्या. इतकेच नव्हे तर खेड तालुक्‍यातील मरकळ गावातील त्यांच्या शेतात संजय बैलाचे चक्क स्मारक उभारले. मंदिर उभे करून आतमध्ये संजयची प्रतिकात्मक मूर्ती ठेवण्यात आली आहे. पठारे कुटुंबीयांची प्राणीमात्रावरच्या अनोख्या प्रेमाची चर्चा पंचक्रोशीत रंगत आहे. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A monument erected by a farmer in Kharadi