पुण्यातील २०० पेक्षा जास्त हॉटेल तीन पट कराच्या कक्षेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hotel Roof

इमारतीच्या गच्चीवर किंवा साइड मार्जिनमध्ये सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या हॉटेलचा शोध अखेर महापालिकेच्या मिळकतकर विभागाने घेणे सुरू केले.

पुण्यातील २०० पेक्षा जास्त हॉटेल तीन पट कराच्या कक्षेत

पुणे - इमारतीच्या गच्चीवर किंवा साइड मार्जिनमध्ये सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या हॉटेलचा शोध अखेर महापालिकेच्या मिळकतकर विभागाने घेणे सुरू केले आहे. आत्तापर्यंत शहराच्या विविध भागातील २०० हॉटेलला नोटीस पाठविण्यात आली आहे. या हॉटेलला तीनपट दंड लावून व्यावसायिक दराने मिळकतकर वसूल केला जाणार आहे.

जून महिन्यात बाणेर येथील एका इमारतीवरील रुफ टॉप हॉटेलला मोठी आग लागली होती, सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा झाली नाही. पण त्यामुळे या हॉटेलमधील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून मिळकतकर विभागाच्या पेठ निरीक्षकांनी त्यांच्या हद्दीतील रुफ टॉप हॉटेलसह फ्रंट मार्जिन, साइड मार्जिनमधील हॉटेलवर कारवाई करा. त्यांना तीनपट कर लावून तो वसूल करा असे आदेश दिले होते. शहरात असे शेकडो हॉटेल असताना देखील महापालिकेने आत्तापर्यंत सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवळ चार ते पाच हॉटेलला तीनपट कर लावला होता.

मिळकतकर विभागातील पेठ निरीक्षकांनी त्यांच्या हद्दीतील मिळकतीच्या वापरात झालेला बदल, अनधिकृतपणे टाकलेले शेड, हॉटेल याची माहिती असते. पण त्यांच्याकडून रुफ टॉप हॉटेलकडे कारवाईस टाळाटाळ केली जात होती. अनेक हॉटेल ही माजी नगरसेवक, राजकीय पदाधिकाऱ्यांचे असल्यानेही नोटीस बजावण्यात आलेली नव्हती. लेखी आदेश देऊनही कारवाई होत नसल्याने पुढच्या आठवड्यात किती हॉटेलला तीन पट कर लावला याची माहिती घेणार आहे. तसेच ज्या भागातील हॉटेलला अभय दिले आहे, अशा पेठ निरीक्षकांसह संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केले जाणार असल्याचा इशारा विक्रम कुमार यांनी दिला होता. त्यानंतर मात्र, मिळकतकर विभागातील कर्मचारी कामाला लागले असून, प्रत्येक भागातील रुफ टॉप हॉटेल व साइड मार्जिनमधील हॉटेलला नोटीस बजावली जात आहे.

मिळकतकर विभागाकडून शहरातील आठ भागाची माहिती मिळाली असून, त्यात १७२ हॉटेलला नोटीस बजावून तीन पट कर लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तर इतर भागात अद्यापही नोटीस बजावण्याचे व कर आकारणाची काम सुरू आहे. त्यामुळे शहरातील किमान २५० हॉटेलला तीन पट कर आकारणी सुरू केली जाणार आहे. त्यातून पाच कोटी पेक्षा जास्त उत्पन्न महापालिकेला मिळेल, माहिती अशी माहिती उपायुक्त अजित देशमुख यांनी दिली.

सात कोटी थकबाकीमुळे ट्रस्टची जागा सील

पर्वती येथील पन्नालाल लुंक्कड ट्रस्टची मिळकतकराची ६ कोटी ९८ लाख ५ हजार ६९ रुपये मिळकतकराची थकबाकी आहे. ही थकबाकी भरावी यासाठी महापालिकेने पाठपुरावा केला. पण ट्रस्टकडून त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेने बुधवारी ही मिळकत सील केली. सहाय्यक आयुक्त वैभव कलडख यांच्या पथकाने ही कारवाई केली. प्रशासन अधिकारी रवींद्र धावरे, आनंद केमसे, सुहास महाजन, प्रदीप आचार्य, सुधीर सणस, गोरक्ष पांगरे, विनोद खवले यांनी ही कारवाई केली.

भाग आणि तीनपट दंड केलेल्या हॉटेलची संख्या

  • कोरेगाव पार्क-मुंढवा - २८

  • भवानी पेठ - ४७

  • कोथरूड - १९

  • खराडी - १३

  • शिवाजीनगर - २२

  • कोंढवा - ७

  • पर्वती - ६

  • बाणेर-बालेवाडी - ३७

Web Title: More Than 200 Hotels In Pune Under Triple Tax Crime Pune Municipal Property Tax Department

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..