esakal | पुण्यासाठी शुक्रवारी पाच हजारांहून अधिक रेमडेसिव्हिरचा साठा उपलब्ध

बोलून बातमी शोधा

पुण्यासाठी शुक्रवारी पाच हजारांहून अधिक रेमडेसिव्हिरचा साठा उपलब्ध

पुण्यासाठी शुक्रवारी पाच हजारांहून अधिक रेमडेसिव्हिरचा साठा उपलब्ध

sakal_logo
By
अनिल सावळे

पुणे : कोरोना बाधित रुग्णांसाठी शुक्रवारी पाच हजारांहून अधिक रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाला. पुणे पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील 462 खासगी कोविड रुग्णालयांना हा साठा वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खासगी कोविड रुग्णालयांची संख्या सुमारे सहाशेच्या जवळपास पोचली आहे. या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनयुक्त आणि आयसीयू बेड्सची संख्या सुमारे 16 हजार इतकी आहे. शुक्रवारी 462 खासगी रुग्णालयांकडून 12 हजार 278 रुग्णांसाठी रेमडेसिव्हिरची मागणी करण्यात आली होती. परंतु त्यांना निम्म्यापेक्षाही कमी रेमडेसिव्हिर उपलब्ध झाले.

हेही वाचा: पुणे रेल्वे स्थानकावर ३१ मे पर्यंत प्लॅटफॉर्म तिकिट बंद

सदोष रेमडेसिव्हिरचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत :

जिल्ह्यासाठी काल गुरुवारी रेमडेसिव्हिर उपलब्ध करण्यात आले. परंतु एका कंपनीच्या रेमडेसिव्हिर औषधामुळे काही रुग्णांना थंडी वाजून येणे, शरीरावर रॅशेस येणे अशा स्वरूपाचे दुष्परिणाम जाणवत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानंतर संबंधित कंपनीच्या बॅचचा सदोष रेमडेसिव्हिरचा साठा अन्न व औषध प्रशासनाने परत मागवून घेतला. त्यापैकी काही नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आली. या घटनेमुळे गुरुवारी बहुतांश खासगी रुग्णालयांना रेमडेसिव्हिर उपलब्ध होऊ शकले नाही.

जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी 462 खासगी कोविड रुग्णालयांतील रुग्णांसाठी पाच हजार 192 रेमडेसिव्हिर उपलब्ध करून दिले आहेत. खासगी कोविड रुग्णालयांतील ऑक्सिजन आणि आयसीयू बेड्सच्या संख्येनुसार प्रशासनाकडून रेमडेसिव्हिर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

- विजयसिंह देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी