पुणे : समाविष्ट २३ गावांच्या हद्दीत ‘डोंगर माथा-उतार’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hill

पुणे : समाविष्ट २३ गावांच्या हद्दीत ‘डोंगर माथा-उतार’

पुणे - महापालिकेतील (Municipal) समाविष्ट २३ गावांसह हद्दीतील टेकड्यांवर (Hill) पुणे महानगर नियोजन विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) (PMRDA) ‘डोंगर माथा- डोंगर उतार’ झोन प्रस्तावित केला आहे. सुमारे ८३५ हेक्टर टेकड्यांवर हा झोन असून यापूर्वी ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील टेकड्यांवरही हाच झोन होता. विकास आराखड्यातही तोच झोन प्रस्तावित केला आहे. (Mountain Top Down within the Boundaries of 23 Villages Included)

पीएमआरडीए हद्दीच्या प्रारूप विकास आराखड्यास राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली. या आराखड्यावर हरकती-सूचना मागविण्याची प्रक्रिया पीएमआरडीएने सुरू केली आहे. महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांसह संपूर्ण हद्दीचा हा विकास आराखडा आहे. हद्दीतील टेकड्यांवर हा झोन कायम ठेवला आहे. समाविष्ट २३ गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर टेकड्या आहेत. तसेच हवेली, मुळशी आणि मावळ तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर टेकड्यांचे क्षेत्र आहे. मात्र, या टेकड्यांवर कोणत्याही स्वरूपाच्या बांधकामास परवानगी दिलेली नाही. हा आराखडा जीआयएस प्रणालीमध्ये आणि थ्रीडीच्या स्वरूपात उपलब्ध करून दिल्यामुळे या टेकड्यांवर होणाऱ्या बांधकामांना आळा घालणे शक्य होणार आहे. तसेच, टेकड्यांवर झोन दर्शविल्यामुळे त्यांचे भूसंपादन करावे लागणार नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

एकाच शहरात तीन नियम

समाविष्ट २३ गावांच्या हद्दीतील टेकड्यांवर ‘डोंगर माथा, डोंगर उतारा’चे तर यापूर्वी (१९९७) समाविष्ट झालेल्या २३ गावांतील टेकड्यांवर ‘बीडीपी’चे (जैववैविध्य पार्क) आरक्षण टाकले आहे. महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यास राज्य सरकारने मान्यता दिली. तर त्या हद्दीतील टेकड्यांबाबत सरकारने कोणतीही निर्णय अद्याप घेतला नाही. त्यामुळे एकाच शहरात टेकड्यांबाबत तीन प्रकाराचे नियम लागू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांसह पीएमआरडीएच्या हद्दीतील टेकड्यांवर ‘डोंगर माथा, डोंगर उतार’ हा झोन टाकण्यात आला आहे. मात्र, टेकड्यांवर कोणत्याही बांधकामांना परवानगी देण्यात आलेली नाही.

- सुहास दिवसे, आयुक्त, पीएमआरडीए

टॅग्स :puneDownMountain