रोगानंतर इलाज! महापालिका करतेय ‘अँटिजेन किट’ खरेदीसाठी हालचाली

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

पुण्यातील कोरोना कमी झाल्याचे महापौरांसह महापालिका आयुक्त, आरोग्य खाते आकड्यानिशी पटवून देत आहे. त्यातूनच तपासण्या आणि उपचार व्यवस्थाही कमी केली आहे. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे चाचण्या वाढविण्याच्या नावाखाली ‘अँटिजेन किट’खरेदीच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्याने ‘आरटीपीसीआर’ (घशातील द्रवपदार्थ नमुने) तपासण्यांना प्राधान्य असताना हे किट कशासाठी, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

पुणे - पुण्यातील कोरोना कमी झाल्याचे महापौरांसह महापालिका आयुक्त, आरोग्य खाते आकड्यानिशी पटवून देत आहे. त्यातूनच तपासण्या आणि उपचार व्यवस्थाही कमी केली आहे. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे चाचण्या वाढविण्याच्या नावाखाली ‘अँटिजेन किट’खरेदीच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्याने ‘आरटीपीसीआर’ (घशातील द्रवपदार्थ नमुने) तपासण्यांना प्राधान्य असताना हे किट कशासाठी, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, डिसेंबर-जानेवारीत कोरोनाचे रुग्ण वाढण्याची चिन्हे असल्याने खबरदारी म्हणून उपाययोजना करीत आहोत. त्यातून ‘अँटिजेन किट’ घेणार असल्याचे आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी स्पष्ट केले. या टप्प्यांत किमान ५० हजार ते एक लाख किट घेतले जाण्याचा अंदाज आहे. या एका किटची किंमत चारशे रुपये आहे. हे किट फ्रिजमध्ये ठेवल्यास कितीही दिवस टिकते. 

आळंदीतील कार्तिकी वारीबाबत सोमवारच्या बैठकीत निर्णय?

शहरात गेल्या महिनाभरापासून कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला असून, रोजची रुग्णसंख्या दोनशे-अडीचशेपर्यंत खाली आली आहे. पुढील महिन्यातही हीच स्थिती राहण्याची शक्‍यता असल्याने महापालिकेने ८ ‘कोविड केअर सेंटर’ बंद केली आहेत. खासगी हॉस्पिटलसोबतच्या कराराचा कालावधीही तीन महिन्यांनी कमी केला आहे. यापुढे कोरोना वाढला तरी महापालिकेची रुग्णालये, दोन जम्बो कोविड केअर सेंटर आणि बाणेरमधील कोविड हॉस्पिटलमधील बेड पुरेसे ठरणार असल्याचे महापालिकेचे आरोग्य खाते सांगत आहे. सध्या चाचण्याही कमी करण्यात आल्या असून, चाचण्यांसाठी लोक पुढे येत नसल्याने त्या कमी केल्याचे महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले. असे असताना ‘अँटिजेन किट’ खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचेही दिसून येत आहे. 

पुण्यात घडली किळसवाणी घटना; अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

‘आरटीपीसीआर’ला प्राधान्य 
पुणे शहरातील घटलेली रुग्णसंख्या लक्षात घेता ‘स्वॅब कलेक्‍शन सेंटर’मध्ये येणाऱ्या प्रत्येकाची ‘आरटीपीसीआर’ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. नव्या रुग्णांना वेळीच शोधून त्यांच्यावरील उपचारासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आता ‘अँटिजेन टेस्ट’ होणार नसल्याचे सांगण्यात आले होते. तरीही त्या सुरूच राहणार असल्याचे नव्या खरेदीवरून दिसत आहे. 

शहरात सध्या कोरोना आटोक्‍यात असून, विशेषत: नवे रुग्ण आणि त्यातील अत्यवस्थ रुग्ण कमी झाले आहेत. दुसरीकडे आता नागरिक स्वत:हून चाचण्यांसाठी येत नाहीत. मात्र, पुढच्या दोन महिन्यांतील कोरोनाचा संसर्ग वाढण्याच्या शक्‍यतेने उपाय करावे लागणार आहेत. सर्व यंत्रणा सक्षम हवी.
- डॉ. आशिष भारती, प्रमुख, आरोग्य विभाग, महापालिका

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Movements purchase of antigen kits Municipal Corporation treatment after disease