बारामतीतील उद्योग सुरू करणार, पण... 

मिलिंद संगई 
Tuesday, 28 April 2020

बारामतीतील उद्योगांचे अडकलेले चाक पुन्हा गतिमान करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

बारामती (पुणे) : कोरोनामुक्तीच्या दिशेने बारामतीची वेगाने वाटचाल सुरू झाली असताना आता उद्योगांचे अडकलेले चाक पुन्हा गतिमान करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बारामती एमआयडीसीतील उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीने आजपासून चाचपणी सुरू झाली असून, जिल्हाधिकारी व सरकारने परवानगी दिल्यास 1 मेनंतर उद्योग सुरू होऊ शकतात. 

याबाबत उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या दालनात आज झालेल्या बैठकीत चर्चा झाली. गेल्या 37 दिवसांपासून बंद असलेले उद्योग पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. काही नियम पाळून उद्योग सुरू करण्यासाठी या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. काही नियमावली तयार करून त्याला जिल्हाधिकारी व सरकारची परवानगी मिळाल्यानंतर उद्योग सुरू करण्याबाबत निर्णय होईल, असे आजचे चित्र होते. मात्र, उद्योग सुरू व्हावेत, ही आग्रही मागणी उद्योजकांच्या वतीने मांडली गेली. यात काही जाचक अटी दूर करून उद्योगाला दिलासा देण्यासाठी बदल करण्याची मागणी केली गेली. याबाबत येत्या दोन दिवसात नियमावली तयार करून 30 मे रोजी पुन्हा याच विषयावर चर्चा करण्याचे या वेळी ठरविण्यात आले आहे. 

बारामतीकरांनो, पुढची चिंता सतावतेय, मग...

याबाबत उद्योजकांच्या भावना राज्य सरकारपर्यंत पोहोचविण्याची हमी कांबळे यांनी दिली. मात्र, प्रतिबंधित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना काम करण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनीही या प्रसंगी उद्योग सुरू होणार असतील; तर काय काळजी घ्यावी लागेल, याबाबत सूचना दिल्या आहेत. बसद्वारे कर्मचाऱ्यांना आणणे किंवा त्यांची कंपनीच्या आवारात निवासाची व्यवस्था करणे शक्‍य नसल्याचे उद्योजकांनी या वेळी स्पष्ट केले आहे. सरकारच्या नियमावलीचे पालन करूनच उद्योग सुरू करण्याची ग्वाही त्यांनी दिली. 

या बैठकीस प्रमोद काकडे, दत्ता कुंभार, धनंजय जामदार, पंढरीनाथ कांबळे, स्वप्नील पाटील, महेश बल्लाळ, एस. बी. पुस्तके, सदाशिव पाटील, चंद्रकांत काळे, अविनाश लगड आदी उपस्थित होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Movements to start an industry in Baramati