esakal | Breaking : कोरोनावरील 'फॅबिफ्ल्यू' गोळ्यांवर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा आक्षेप
sakal

बोलून बातमी शोधा

mp dr amol kolhe objections about fabiflu tablets

कंपनीच्या दाव्यानुसार कोरोनाच्या रुग्णांना १४ दिवस या गोळ्या घ्याव्या लागतील. म्हणजे 14 दिवसांत 122 गोळ्या घ्यायच्या आहेत. त्याचा खर्च सुमारे 12 हजार 500 रुपये येईल.
- डॉ. अमोल कोल्हे, खासदार

Breaking : कोरोनावरील 'फॅबिफ्ल्यू' गोळ्यांवर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा आक्षेप

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : कोविड 19 च्या रुग्णांना बरं करण्याचा दावा करणाऱया 'ग्लेनमार्क' या कंपनीच्या 'फॅबिफ्ल्यु' या औषधाच्या चाचणी, परिणामकारकता आणि किंमतीबद्दल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गंभीर आक्षेप उपस्थित केले आहेत. अर्धवट माहिती मीडियातून सादर करून लाखो नागरिकांची दिशाभूल होणार असल्याचे सांगत त्यांनी यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना पत्र लिहून तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.

आणखी वाचा - भाजप-राष्ट्रवादी युतीच्या चर्चेवर रोहित पवार यांचा खुलासा

'ग्लेनमार्क' या औषध कंपनीने पत्रकार परिषद घेऊन फॅबिफ्ल्यु हे औषध कोरोनाच्या रुग्णांना बरं करेल, असे जाहीर केले आहे. त्यासाठी कंपनीने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचाही (आयसीएमआर) दाखला दिला आहे. तसेच ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डिसीजीआय) या औषधाचा रुग्णांसाठी वापर करण्यास परवानगी दिली आहे, असेही 'ग्लेनमार्क'ने स्पष्ट केले आहे. पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार 'फॅबिफ्ल्यु' या एका गोळीची किंमत 103 रुपये आहे. यावर आक्षेप नोंदवत कोल्हे यांनी पत्रात म्हटलंय "कंपनीच्या दाव्यानुसार कोरोनाच्या रुग्णांना १४ दिवस या गोळ्या घ्याव्या लागतील. म्हणजे 14 दिवसांत 122 गोळ्या घ्यायच्या आहेत. त्याचा खर्च सुमारे 12 हजार 500 रुपये येईल. हि किंमत सर्वसामान्यांना परवडणारी नाही. कोरोनासारख्या  जागतिक आपत्तीत दररोज रुग्णांची संख्या वाढत असताना गरीब, कनिष्ठ मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीयांना कमीत कमी किमतीत उपचार उपलब्ध करून देणं, याला सरकारंच प्राधान्य असायला हवं. त्यामुळेच या औषधाची चाचणी तातडीने महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील रुग्णांवर करण्यात आली. असं असूनही त्या सर्वसामान्य रुग्णांच्या आर्थिक क्षमतेचा विचार हि किंमत ठरवताना केलेला दिसत नाही." कोल्हे यांनी आरोग्य मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रांतून हे नवीन औषध सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. 

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

ग्लेनमार्कने केलेल्या दाव्यानुसार 'फॅबिफ्ल्यु' हे  कोरोनावर एकमेव औषध आहे, या दाव्यातही तथ्य नसल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे. त्यांच्या पत्रात दिलेल्या माहितीनुसार 'फॅबिफ्ल्यु'च्या चाचण्यांबद्दल क्लिनिकल ट्रायल्स रजिस्ट्री - इंडियाच्या (सीटीआरआय) संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार एप्रिल - मे महिन्यात कोरोनाच्या सौम्य लक्षणे असलेल्या 90 आणि मध्यम लक्षणे असलेल्या 60 रुग्णांवर चाचण्या झाल्या आहेत. परंतु, त्यासाठी केवळ 'फॅबिफ्ल्यु' ही गोळी वापरण्यात आलेली नाही. तर अन्य औषधांचाही वापर झाला आहे. कोरोनाच्या उपचारांदरम्यान प्रकृती स्थिर असलेल्या आणि दोन सौम्य लक्षणे आणि चार मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांवरच ही चाचणी झाली. ज्या रुग्णांमध्ये 'ऑक्सिजन लेव्हल' 94 टक्क्यांपेक्षा (एसपीआे 2) कमी आहे, त्यांना या चाचणीतून वगळण्यात आल्याची नोंद 'सीटीआरआय'च्या संकेतस्थळावर आहे, असेही डॉ. कोल्हे यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. तसेच रक्तदाब, मधुमेह आदी प्रकारचे आजार असलेल्या रुग्णांवर 'फॅबिफ्ल्यु' चाचणीचा परिणाम काय झाला आहे, याची पुरेशी माहिती उपलब्ध नाही, तसेच कोरोनामुळे अत्यवस्थ असलेल्या रुग्णांवर 'फॅबिफ्ल्यु'चा काय परिणाम झाला आहे, हे देखील स्पष्ट झालेले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे माध्यमातून दिलेल्या अर्धवट माहितीमुळे नागरिक तसेच वैद्यकीय कर्मचारी यांची दिशाभूल होण्याची दाट शक्यता आहे. या औषधाचा सर्रास वापर झाल्यास सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर आणि नागरिकांच्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीवर विपरित परिणाम होईल, अशी भीतीही डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. 'ग्लेनमार्क'चा 'फॅबिफ्ल्यु'बाबतच्या दाव्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तातडीने पावले उचलावीत आणि निर्बंध आणावेत. तसेच 'डिसीजीआय', आयसीएमआरमार्फत जाहीर चर्चा घडवून आणावी, अशीही विनंती डॉ. कोल्हे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना पत्रात केली आहे.

आणखी वाचा - बाप रे! लग्नातला फोटोग्राफर निघाला कोरोना पॉझिटिव्ह

फॅबिफ्ल्युबद्दलचे हे आहेत आक्षेप

  • किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.
  • फॅबिफ्ल्युच्या चाचणी दरम्यान अन्य औषधांचाही वापर
  • प्रकृती स्थिर असलेल्या आणि दोनच सौम्य लक्षणे आणि चार मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांवरच ही चाचणी झाली
  • ज्या रुग्णांमध्ये ऑक्सिजन लेव्हल 94 टक्क्यांपेक्षा (एसपीआे 2) कमी आहे, त्यांना या चाचणीतून वगळण्यात आले
  • ज्या रुग्णांना रक्तदाब, मधुमेह आदी प्रकारचे आजार आहे, त्यांच्यावर फॅबिफ्ल्यु चाचणीचा परिणाम काय झाला आहे, याची पुरेशी माहिती उपलब्ध नाही
  • अत्यवस्थ असलेल्या रुग्णांवर फॅबिफ्ल्युचा काय परिणाम झाला आहे, हे स्पष्ट नाही
loading image