"स्मार्ट सिटी' च्या कामांची चौकशी करा; गिरीश बापट यांची केंद्राकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

पुणे स्मार्ट सिटीच्या कामांचा दर्जा, त्याला होत असलेला विलंब आणि त्यातील प्रकल्पांची उपयुक्तता, या बाबत "सकाळ'ने प्रत्यक्ष पाहणी करून,गेले दोन दिवस वृत्तमालिका केली होती.

पुणे - स्मार्ट सिटी कंपनीने पुण्यात केलेल्या कामांचा दर्जा निकृष्ट असून, नियमबाह्य पद्धतीने ती झाली आहेत. तसेच केंद्र सरकारने कंपनीला दिलेल्या निधीचाही विनियोग योग्य पद्धतीने झालेला नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीने केलेल्या कामांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी खासदार आणि स्मार्ट सिटी सल्लागार समितीचे अध्यक्ष गिरीश बापट यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. 

पुणे स्मार्ट सिटीच्या कामांचा दर्जा, त्याला होत असलेला विलंब आणि त्यातील प्रकल्पांची उपयुक्तता, या बाबत "सकाळ'ने प्रत्यक्ष पाहणी करून, गेले दोन दिवस वृत्तमालिका केली होती. खासदार बापट यांनी त्याची दखल घेतली. केंद्रीय नगरविकास खात्याचे सचिव आणि स्मार्ट सिटी मिशनचे प्रमुख दुर्गाशंकर मिश्रा यांना बापट यांनी पत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, "केंद्र सरकारने पुणे स्मार्ट सिटीला पुरेसा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, त्या निधीचा पुरेपूर विनियोग झालेला नाही. तसेच ज्या कामांवर खर्च केला आहे, त्यांचा दर्जाही निकृष्ट आहे. काही कामे नियमबाह्य पद्धतीने झाली आहेत. तसेच कंपनीच्या कारभाराचे लेखापरीक्षणही झालेले नाही. त्यामुळे कंपनीने केलेल्या कामांची सखोल चौकशी करावी. त्यामुळे तरी पुढील कामांचा दर्जा उंचावेल आणि सुरू असलेले प्रकल्प निश्‍चित कालमर्यादेत पूर्ण होतील.' 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कंपनीचे कामकाज योग्य पद्धतीने सुरू नाही. अनेक प्रकल्प प्रदीर्घ काळ रेंगाळले आहेत. तसेच जे प्रकल्प सुरू आहेत, त्यावर उधळपट्टी झाली असून, त्यात अनेक त्रुटी आहेत, असेही बापट यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

पुणे स्मार्ट सिटीने कंपनीच्या सल्लागार समितीची बैठक नुकतीच झाली. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनीही कंपनीच्या कामाबाबत नापसंती व्यक्त करून झालेल्या कामांचा चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्मार्ट सिटी म्हणते रॅंकिंग सुधारले ! 
स्मार्ट सिटी प्रकल्पात पुण्याचे रॅंकिंग आता 13 व्या क्रमांकावर पोचले आहे. या पूर्वी पुणे 15 व्या क्रमांकावर होते. पुणे स्मार्ट सिटी प्रशासनाने या बाबत प्रसिद्धिपत्रकाद्वारे शुक्रवारी ही माहिती कळविली. कंपनीने लॉकडाउनपूर्वी सुरू केलेली कामे निरंतर सुरू ठेवली आहेत. तसेच नवे डिजिटल उपक्रमही सुरू केले आहेत, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी कळविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Girish Bapat has demanded a thorough inquiry into the work done by Smart City