म्हणून शरद पवारांनी केला सातारा दौरा रद्द

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 October 2019

दिवाळीनिमित्त शरद पवार यांचा मुक्काम बारामतीत असून, त्यांनी श्रीनिवास पाटील यांना बारामतीत बोलावून घेतले होते. विद्यानगरीतील "व्हीआयआयटी'मध्ये शरद पवार व श्रीनिवास पाटील यांचा गप्पांचा फड रंगला असताना पुरंदरचे नवनिर्वाचित आमदार संजय जगताप हेदेखील त्या ठिकाणी उपस्थित होते.

बारामती शहर : सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मिळविलेल्या ऐतिहासिक विजयानंतर नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील यांनीच शुक्रवारी संध्याकाळी बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी पाटील यांचा पवार यांनी सत्कार केला; तर पाटील यांनीही पवार यांचा सत्कार करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. हा कार्यक्रम खरं तर साताऱ्यातच करण्याचे योजले होते, परंतु तेथील राजकीय परिस्थितीमुळे श्रीनिवास बारामतीत आले आणि हा हृद्य सोहळा संपन्न झाला, असे ट्विट पवार यांनी केले आहे.

दिवाळीनिमित्त शरद पवार यांचा मुक्काम बारामतीत असून, त्यांनी श्रीनिवास पाटील यांना बारामतीत बोलावून घेतले होते. विद्यानगरीतील "व्हीआयआयटी'मध्ये शरद पवार व श्रीनिवास पाटील यांचा गप्पांचा फड रंगला असताना पुरंदरचे नवनिर्वाचित आमदार संजय जगताप हेदेखील त्या ठिकाणी उपस्थित होते. यानिमित्ताने अनेक जुन्या आठवणींना या जुन्या मित्रांनी उजाळा दिला. 

या वेळी अनेक हास्यविनोद झाले. त्यातून हास्याचे फवारे उडाले. लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयाचा आनंद आणि श्रीनिवास पाटील यांच्या नर्मविनोदी शैलीतील संभाषणामुळे या ठिकाणचे वातावरण प्रफुल्लित झाले होते. 

या सत्कार समारंभानंतर श्रीनिवास पाटील व शरद पवार या जिवलग मित्रांच्या निवांत गप्पा झाल्या. त्यानंतर श्रीनिवास पाटील व शरद पवार हे एकाच गाडीतून "गोविंदबागे'कडे रवाना झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sriniwas Patil meet Sharad Pawar in Baramati