सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीबाबत सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

टीम ई सकाळ
Thursday, 21 January 2021

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही.

पुणे - देशभरात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी 16 तारखेपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. यामध्ये पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट आणि बायोटेकच्या लशींना परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांच्याशी चर्चा केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की, आदर पूनावाला यांच्याशी फोनवरून बोलणं झालं आहे. सीरममध्ये लागलेल्या आगीच्या घटनेची माहिती घेतली असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाकडून यासाठी पूर्णपणे सहकार्य केलं जात असून आवश्यक ती मदत पुरवली जात आहे. सध्या आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. 

हे वाचा - Video : पुणे - सीरम इन्स्टिट्यूटमधील आग आटोक्यात; 5 जण सुखरुप बाहेर

आग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून मदत होतेय अशी माहिती पूनावाला यांनी दिल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसंच सध्या सर्व सुरक्षित असून परिस्थिती नियंत्रणात आहे. सर्वजण सुखरुप बाहेर पडल्यानंतरच नुकसानीचा आढावा घेतला जाईल. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात यश मिळालं असून सुदैवाने या आगीत कोणतीही जिवितहानी झालेली नाही. ही बाब दिलासादायक असल्याचंही खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. 

हे वाचा - Fire In Serum Institute : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये अग्नीतांडव; पाहा फोटो

कोविशील्ड प्लांट सुरक्षित
बीसीजी लसीचं उत्पादन सुरु असलेल्या इमारतीला आग लागली आहे. तर कोरोना प्रतिबंधक लस SEZ 3 या बिल्डिंग मध्ये तयार होते त्या बिल्डिंगला आगीची झळ नाही अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटने दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP supriya sule reaction on serum institute fire break