

भाग १
प्रज्वल रामटेके : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २८ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा प्रक्रियेतील अनिश्चितता, वारंवार पुढे ढकलल्या जाणाऱ्या परीक्षा, प्रलंबित निकाल आणि नियुक्त्यांवरील चौकशीमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले आहे. गेल्या दोन वर्षांत एकही परीक्षा सुरळीत पार पडलेली नाही, तर आगामी दोन महिन्यांतही एकाही परीक्षेचे नियोजन नसल्याने विद्यार्थ्यांमधील असंतोष वाढला आहे.
सततची प्रतीक्षा, वाढणारे वय, अभ्यासाचा मोठा खर्च आणि मानसिक ताण यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र निराशेचे वातावरण आहे. याप्रश्नी विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर महिन्यात पुण्यात ११ दिवस सलग आंदोलनही केले होते. मात्र, परीक्षा व निवड प्रक्रियेतील अनिश्चितता अजूनही कायम आहे.
गेल्या दोन वर्षांचा (१ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२६) आढावा घेतल्यास, परीक्षांचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त मुख्य परीक्षा-२०२६ (३ ऑक्टोबर) आणि महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) संयुक्त परीक्षा-२०२६ (५ डिसेंबर) या दोन्ही महत्त्वाच्या मुख्य परीक्षा पुढे ढकलल्या असून, त्यांच्या नवीन तारखा अद्याप जाहीर झाल्या नाहीत, तर २५ ऑक्टोबर २०२६ रोजी नियोजित असलेली गट-क संयुक्त पूर्व परीक्षा थेट ३ जानेवारी २०२७ वर ढकलण्यात आली. स्थापत्य आणि विद्युत अभियांत्रिकी (२०२५) परीक्षांचे निकाल जाहीर झाले असले, तरी पुढील प्रक्रियेबाबत संभ्रम कायम आहे.
ज्या परीक्षांचे निकाल लागले आहेत, तिथे नियुक्ती नाही आणि जिथे नियुक्त्यांची वेळ आली, तिथे चौकशीचे ग्रहण लागले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा, गट-ब आणि गट-क च्या २०२५ मधील परीक्षांच्या मुख्य परीक्षा पूर्ण होऊन निकाल आणि शिफारस याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, या परीक्षा न्यायालयीन, प्रशासकीय चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. औषध निरीक्षक (गट-ब) २०२५ या परीक्षेत झालेल्या गैरप्रकारामुळे २६ ऑगस्टला ही संपूर्ण परीक्षाच आयोगाने रद्द केली. दुसरीकडे, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा (२०२४) आणि अन्न व औषध प्रशासन सेवा (२०२३) यांच्या अंतिम शिफारस याद्या जाहीर होऊनही न्यायालयीन प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या अद्याप प्रलंबित आहेत.
पुढचे दोन महिने परीक्षाच नाही
येत्या दोन महिन्यांत आयोगाची एकही परीक्षा नियोजित नाही. यामुळे पुण्यात राहून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. वाढते वय, मेस-लायब्ररीचा वाढता खर्च आणि घरून येणारा मर्यादित पैसा यामुळे विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत सापडले आहेत. त्यामुळे परीक्षा वेळेत घेणे, निकाल जाहीर करणे आणि निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देणे या प्रक्रियांमध्ये निश्चित कालमर्यादा असावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.
परीक्षांमधील विलंब, रखडलेले निकाल आणि नियुक्त्यांबाबतच्या अनिश्चिततेमुळे विद्यार्थ्यांचे वय, पैसा आणि वेळ वाया जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक संकटाचाही सामना करावा लागत आहे. हा केवळ परीक्षेचा नव्हे, तर गंभीर सामाजिक प्रश्न आहे. आयोगाने मनुष्यबळ वाढवून परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करावे आणि नियुक्त्या वेळेत द्याव्यात.
- महेश घरबुडे, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन
परीक्षा, निकाल आणि नियुक्त्यांमधील अनिश्चिततेमुळे अभ्यासापेक्षा भविष्याची चिंता अधिक सतावत आहे. वय वाढत असून, पुण्यात राहून अभ्यास करण्याचा खर्चही परवडेनासा झाला आहे. विद्यार्थ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन आयोगाने परीक्षा आणि निवड प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी.
- मदन जगताप, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी
या परीक्षांची चौकशी सुरू
- औषध निरीक्षक परीक्षा, गट-ब, २०२५
- महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, २०२५
- महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा, २०२५
- महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, २०२५
- महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा, २०२५
- महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा, २०२४
- अन्न व औषध प्रशासन सेवा मुख्य परीक्षा, २०२३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.