esakal | 'धीर धरा...' तरुण महिला अधिकाऱ्याचं MPSCच्या उमेदवारांना आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

priya gawali mpsc student

राज्यात एमपीएससीच्या 14 मार्चला होणाऱी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करत आंदोलन सुरु केलं आहे. 

'धीर धरा...' तरुण महिला अधिकाऱ्याचं MPSCच्या उमेदवारांना आवाहन

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे - राज्यात एमपीएससीच्या 14 मार्चला होणाऱी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करत आंदोलन सुरु केलं आहे. परीक्षा 14 मार्च रोजीच घ्याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. राज्यात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आहे. पुण्यात नवी पेठेत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी एकत्र आले होते. यावेळी काही राजकीय नेतेही आंदोलनात उपस्थित होते. भाजपचे नेते गोपिचंद पडळकर यांनी रात्रभर इथेच राहू असं म्हणत ठिय्या मांडला होता. रात्री उशिरा त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर एका तरुण महिला अधिकाऱ्याचं ट्विट व्हायरल होतं आहे. प्रिया गवळी असं महिला अधिकाऱ्याचं नाव असून त्या बारामतीत महिला आणि बालविकास अधिकारी म्हणून काम पाहतात. 2019 ला त्या एमपीएससी परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी झाल्या आहेत. 

सोशल मीडियावरून त्यांनी एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मेसेज दिला आहे. यात त्यांनी म्हटलं की, परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. रात्रंदिवस परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही नक्कीच खेदाची गोष्ट आहे पण धीर धरा. कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नका. आयुष्य राहीलं तरच पुढं काहीतरी करता येईल. खचून जाऊ नका यातून काहीतरी मार्ग निघेल असं त्यांनी पोस्ट मध्ये म्हटलं आहे. 

हे वाचा - जीवन मरणाच्या प्रश्नात अडकले MPSCचे विद्यार्थी!

वर्षभरात पाच वेळा परीक्षा पुढे ढकलली
गेल्या वर्षभरात कोरोनामुळे अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. शाळा कॉलेजेस सुरु नाहीत, परीक्षा ऑनलाइन घेतल्या जात आहेत. यातच एमपीएससीच्या वेगवेगळ्या परीक्षा याआधी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात सरकारबद्दल संतापाची भावना निर्माण झाली होती. त्यातच दोन दिवसांवर आलेली परीक्षा अचानक पुढे ढकलल्यानं विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरु केलं आहे. 

हे वाचा - हॉल परीक्षेचा नाही तर थेट लग्नाचा; ऐका MPSCच्या मुलींची व्यथा

आठ दिवसात परीक्षा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, नागपूर, कोल्हापूर, वाशिम, परभणी, अमरावती आदी शहरांमध्ये विद्यार्थी एमपीएससी परीक्षा रद्द केल्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले होते. राज्यभरातून विद्यार्थ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर आणि सर्वपक्षीय नेत्यांनी याला विरोध केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री साडेआठ वाजता सोशल मीडियावरुन व्हिडिओद्वारे संवाद साधत येत्या आठ दिवसांत MPSCची परीक्षा घेण्यात येईल असं आश्वासन दिलं. 

loading image
go to top