MPSC : स्थगित आंदोलनासाठी ‘तगडा’ पोलिस बंदोबस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP Agitation

राज्यसेवा मुख्य परीक्षेतील नवे बदल २०२५ पासून लागू करावे, या मागणीसाठी काही असंघटित विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते.

MPSC : स्थगित आंदोलनासाठी ‘तगडा’ पोलिस बंदोबस्त

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) धमकीवजा सूचना आणि पोलिसांनी नाकारलेली परवानगी यामुळे सोमवारी होणारे आंदोलन विद्यार्थ्यांनीच स्थगित केले. मात्र, तरीही शास्त्री रस्त्यावरील नियोजित आंदोलनस्थळी पोलिसांचा गराडा पाहायला मिळाला. आंदोलक शून्य तर पोलिसांची संख्या तब्बल ८० होती.

राज्यसेवा मुख्य परीक्षेतील नवे बदल २०२५ पासून लागू करावे, या मागणीसाठी काही असंघटित विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते. मात्र, विद्यार्थ्यांचे हे आंदोलन एमपीएससीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असून, त्यांच्यावर उचित कारवाई करण्यात येईल, असे ट्वीटच एमपीएससीने केले होते. कारवाईची भीती आणि करिअरचा प्रश्न पाहता विद्यार्थ्यांनी हे आंदोलनच गुंडाळले. त्यासंबंधी पत्रकेही नवी पेठेत लावण्यात आली होती. तरीही पोलिसांनी शास्त्री रस्त्यावर मोठा फौजफाटा तैनात केला होता. सकाळपासूनच पोलिस बंदोबस्त असल्याने विद्यार्थी तिकडे फिरकलेच नाही.

लोकशाहीला काळिमा - राष्ट्रवादी

विद्यार्थ्यांनी स्थगित केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने नवी पेठेत एमपीएससी आणि शासनाच्या विरुद्ध आंदोलन केले. यावेळी प्रवक्ते प्रदीप देशमुख म्हणाले, ‘‘आयोगाचा नवीन अभ्यासक्रमाचा निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु त्याच्या तयारीसाठी पुरेसा वेळ देने गरजेचे आहे. एमपीएससीच्या नव्या फतव्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाईचा इशारा आयोगाने दिला आहे. ही बाब लोकशाहीला काळिमा फासणारी आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मूलभूत अधिकारांचीच मुस्कटदाबी झाली आहे. नवीन बदल २०२५ पासून राबविण्यात यावे.’’ आंदोलनावेळी रोहन पायगुडे, अजिंक्य पालकर, दीपक पोकळे, सागर काकडे, मदन कोठूळे आदी उपस्थित होते.

एमपीएससीच्या बदललेल्या अभ्यासक्रमासंदर्भात शास्री रस्ता येथे विद्यार्थी आंदोलन करण्याची शक्यता होती. म्हणून दक्षतेसाठी ७० कर्मचारी व १० पोलिस अधिकारी तैनात करण्यात आले होते. सकाळपासून सायंकाळ पर्यंत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

- सुनील माने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विश्रामबागवाडा

विद्यार्थ्यांवर कारवाई होऊ शकते. म्हणून आम्ही हे आंदोलन स्थगित केले आहे. आयोगाने नवीन अभ्यासक्रम २०२५ नंतरच लागू करावा ही आमची मागणी कायम आहे.

- सूरज, विद्यार्थी

एमपीएससीने ट्वीट करत सरळ सरळ धमकीच दिली आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शोधून किंवा वर्तमानपत्रातील नाव बघून एमपीएससी काळ्या यादीत टाकू शकते. त्यामुळे ही मागणी आणि त्यासंबंधीचे आंदोलनच चिरडले गेले आहे. आज तरी आंदोलन आम्ही स्थगित केले.

- राहूल, परीक्षार्थी

Web Title: Mpsc Exam Student Agitation Stop Police Bandobast Ncp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :policeNCPstudentMPSC Exam
go to top