वीजबिलांबाबत महावितरणने काय केला दावा? वीज ग्राहकांनो, वाचा सविस्तर बातमी!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

वेबपोर्टल आणि मोबाईल ऍपद्वारे मीटरचे रिंडीग पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. यामध्ये 2 कोटी 30 लाख ग्राहकांपैकी केवळ 3 लाख 65 हजार वीजग्राहकांनी स्वतःहून मीटर रिडींग पाठविले.

पुणे : लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांनी केलेल्या वीजवापराचे प्रत्यक्ष रिडींग घेतल्यानंतर संगणीकृत बिलिंग प्रणालीद्वारे एप्रिल, मे महिन्यासह जूनचे देण्यात आलेले तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल स्लॅब बेनिफीटसह योग्य व अचूक आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकाराचा अतिरिक्त भुर्दंड लावण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्राहकांनी वीजबिलांबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये आणि कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर वीजबिल दुरुस्तीसाठी कार्यालयांत गर्दी करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 

पुण्यातील दोन खासदार देशातील टॉप फाईव्ह परफॉर्मर! वाचा सविस्तर रिपोर्ट

दरम्यान, दोन ते तीन महिन्यांच्या एकत्रित वीजबिलाची माहिती घेण्यासाठी तसेच स्लॅब बेनिफिट, भरलेल्या रकमेचे समायोजन, मासिक वीजवापर आणि स्लॅबप्रमाणे लावलेला वीजदर आदींची संपूर्ण पडताळणी करण्यासाठी महावितरणने वीजग्राहकांसाठी खास https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ ही लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. केवळ ग्राहक क्रमांक देऊन या लिंकद्वारे वीजबिलाचा संपूर्ण हिशोब आणि महावितरणकडून करण्यात आलेले विश्‍लेषण पाहण्यासाठी महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

अर्सेनिक अल्बम-30 वापटला स्थगिती मागत होते; कोर्टाने घेतला मोठा निर्णय

कोरोना विषाणूमुळे राज्यात 23 मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे महावितरणकडून मीटर रिडींग, वीजबिल वितरण आणि बिल भरणा केंद्र बंद करण्यात आले होते. रिडींग बंद झाल्यामुळे राज्यातील लघुदाब ग्राहकांना सरासरी वीजबिल देण्यात आले. तसेच वेबपोर्टल आणि मोबाईल ऍपद्वारे मीटरचे रिंडीग पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. यामध्ये 2 कोटी 30 लाख ग्राहकांपैकी केवळ 3 लाख 65 हजार वीजग्राहकांनी स्वतःहून मीटर रिडींग पाठविले.

उर्वरित वीजग्राहकांना पाठविण्यात आलेली सरासरी वीजबिले दुरुस्त करण्यासाठी रिडींग घेणे आवश्‍यक होते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर 1 जूनपासून स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या भागात मीटर रिडींग, वीजबिल वितरण व बिल भरणा केंद्र सुरु करण्यात आले आहे. मीटर रिडींग प्रत्यक्ष उपलब्ध झाल्यानंतर वीजग्राहकांना लॉकडाऊन कालावधीमधील एप्रिल व मेसह जून महिन्याचे वीजबिल एकत्रित पाठविण्यात येत आहे. 

यंदा राज्य मंडळाचा अभ्यासक्रम होणार कमी - दिनकर पाटील

वीजग्राहकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत सरासरी वीजबिलांचा भरणा केला असल्यास जूनमधील तीन महिन्यांच्या एकत्रित वीजबिलामध्ये एप्रिल व मे महिन्यांचा स्थिर आकार आणि विद्युत शुल्क वगळता उर्वरित रक्कम समायोजित करण्यात येत आहे. यासंबंधीची माहिती ग्राहकांसाठी वीजबिलामध्ये नमूद करण्यात आली आहे. एप्रिल, मे व जून महिन्यांचे वीजबिल वीजग्राहकांना एकत्रित परंतु स्वतंत्र मासिक हिशोबानुसार देण्यात आलेले आहे. ते योग्य स्लॅब व वीजदरानुसार तसेच प्रत्यक्ष वीजवापरानुसारच आहे. एका पैशाचाही अतिरिक्त भुर्दंड या वीजबिलामध्ये लावण्यात आलेला नाही. त्यामुळे वीजग्राहकांनी कोणताही संभ्रम न ठेवता वीजबिल दुरुस्तीसाठी कार्यालयात जाऊ नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL has appealed to the consumers dont confused about electricity bills