‘एमएसआरडीसी’च्या रिंगरोडमध्ये बदल?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

‘ओव्हरलॅप’मुळे करावी लागणार मार्गाची नव्याने आखणी

पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला, तरी या मार्गाची नव्याने आखणी करावी लागणार आहे. त्यामुळे महामंडळाच्या मंजुरी मिळालेल्या मार्गात पुन्हा बदल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘ओव्हरलॅप’मुळे करावी लागणार मार्गाची नव्याने आखणी

पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला, तरी या मार्गाची नव्याने आखणी करावी लागणार आहे. त्यामुळे महामंडळाच्या मंजुरी मिळालेल्या मार्गात पुन्हा बदल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड हद्दीतील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी १९९७ च्या प्रादेशिक आराखड्यात रिंगरोड प्रस्तावित करण्यात आला होता. या रिंगरोडचे काम ‘एमएसआरडीसी’ला देण्यात आले होते; परंतु या प्रस्तावित रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे हा मार्ग रद्द करून नवीन मार्गाची आखणी करावी, असा प्रस्ताव एमएसआरडीसीने राज्य सरकारकडे दिला होता. त्यास राज्य सरकारनेही मान्यता दिली होती. त्यानुसार एमएसआरडीसीने अमेरिकन कंपनीकडून उर्से टोल नाक्‍यापासून खेड शिवापूरपर्यंत ८४ किलोमीटर लांबीच्या अर्धवर्तुळाकार रस्त्याची नव्याने आखणी केली होती.

पीएमआरडीएची स्थापना झाली. पीएमआरडीएने प्रादेशिक आराखड्यातील रिंगरोडमध्ये थोडा बदल करून तो विकसित करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने पीएमआरडीए आणि एमएसआरडीसी या दोन्हींच्या रिंगरोडला मान्यता दिली; परंतु हे दोन्ही रिंगरोड ‘ओव्हरलॅप’ होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे अडचण निर्माण झाली होती. एकाच गावातून दोन रिंगरोड जात असल्यामुळे भूसंपादनास विरोध होत होता. त्यामुळे कोणता रिंगरोड होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती; परंतु सोमवारी (ता. २७) मुख्यमंत्र्यांनी दोन्ही रिंगरोड होणार असल्याचे जाहीर केले. तसेच ज्या ठिकाणी दोन्ही रस्ते ओव्हरलॅप होतात, अशा ठिकाणचा निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन केली असल्याचेही सांगितले.

रिंगरोड आखणीत दुसऱ्यांदा बदल
प्रादेशिक आराखड्यातील रिंगरोडला १९९७ मध्येच मान्यता मिळाली आहे. तो रिंगरोड ग्राह्य धरून बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यात बदल करणे शक्‍य नाही. परिणामी एमएसआरडीसीच्या रिंगरोड आखणीत दुसऱ्यांदा बदल करावा लागणार असून, रिंगरोडची आखणी नव्याने करावी लागणार आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

१२८ किलोमीटर पीएमआरडीएचा रिंगरोडची लांबी

८४ किलोमीटर एमएसआरडीसीचा रिंगरोडची लांबी

येथे होतो रिंगरोड ओव्हरलॅप
उर्से, तळेगाव, देहू, चाकण, मोशी, आळंदी आणि मरकळ या गावांत हे दोन्ही रिंगरोड ओव्हरलॅप होत आहेत. जवळपास ४० ते ४५ किलोमीटर अंतर ओव्हरलॅप होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: msrdc ringroad changes