मुळशीच्या आपत्ती व्यवस्थापनाचे मावळे करणार पंढरीत विठ्ठल भक्तांची सेवा... 

mulshi
mulshi

पिरंगुट (पुणे) : पंढरपुरामध्ये उद्या देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त यात्रा आहे. मात्र, या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा भरणार नाही. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे. त्यासाठी पंढरपूर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथकाची मागणी केली आहे. त्यानुसार २ जुलैपर्यंत हे पथक तेथील आपत्ती व्यवस्थापनाला सहकार्य करणार आहे. त्यासाठी हे पथक आज विठ्ठल भक्तांच्या सेवेसाठी पंढरपूरला रवाना झाले. 

जिल्ह्यात काय परजिल्ह्यातही कुठे कुणी पाण्यात बुडाले की, पहिला फोन येतो तो मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन पथकाला. विश्वासार्ह, हक्काचे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या भाषेत 'एक्सपर्ट' असे हे पथक आहे. अनेक प्रसंगाला सामोरे गेल्याने खाचाखोचा माहीत असणारे आणि रात्री अपरात्रीही फोन केला तरी तातडीने प्रतिसाद देणारे हे पथक आता जिल्ह्यातच नव्हे राज्यात प्रसिद्ध झाले आहे. गेल्यावर्षी पंढरपूरला या पथकाने चोख, निस्वार्थी आणि सेवा म्हणून बजावलेले चोख कर्तव्य सगळ्यांच्या कौतुकाचा विषय ठरला होता. त्याचेच फळ म्हणून याही वर्षी या पथकाची आवर्जून पंढरपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी मागणी केली आहे. त्यानुसार हे पथक आज विठ्ठल भक्तांच्या सेवेसाठी पंढरपूरला रवाना झाले. 

पंढरपुरामध्ये उद्या देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त यात्रा आहे. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा होणार नसली, तरी खबरदारीचा उपाय म्हणून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे. त्यासाठी पंढरपूर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथकाची मागणी केली आहे. त्यानुसार २ जुलैपर्यंत हे पथक तेथील आपत्ती व्यवस्थापनाला सहकार्य करणार आहे. 

मुळशी तालुका पथकाचे अध्यक्ष प्रमोद बलकवडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह हे पथक आज पंढरपूरला रवाना झाले. पंढरपूरमधील पुंडलिक मंदिर आणि चंद्रभागा नदी परीसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, त्यासाठी हे पथक काम करणार आहे. पुणे येथील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांच्या हस्ते मुळशीच्या पथकाला परवानगी पत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. या पथकाची नुकतीच नोंदणी झाली आहे. प्रमोद बलकवडे या पथकाचे अध्यक्ष असून दिनेश कांबळे, गणेश तापकीर, शार्दूल बलकवडे, गौरव धनवे, 
धनंजय मानकर, मंदार तापकीर, आनंद स्वामी, संकेत हिरेमठ, माउली अडेटराव आदींचा त्यात समावेश आहे. 

या पथकाला पुणे जिल्यात महिन्यातून किमान तीन ते चार वेळा विविध घटनामध्ये मदतीसाठी जावेच लागते. पाण्यात बुडालेले मृतदेह या पथकाने अनेकदा जीवाची बाजी लावून बाहेर काढलेले आहेत. प्रसंगी दिवसदिवस उपाशीपोटी हे काम करावे लागलेले आहे. किमान दोन दिवस ते दहा दिवसापर्यंत पाण्यात बुडालेले व गायब झालेले मृतदेह या पथकाने रात्रंदिवस शोध घेऊन न थकता मोठ्या कौशल्याने, मेहनतीने आणि जीव धोक्यात घालून बाहेर काढलेले आहेत. काही वेळा तर पदरमोड करून बेवारस मृतदेहांचा अंत्यविधीही केलेला आहे. रस्त्यावरील अपघातग्रस्तांना तातडीने उपचार केंद्रापर्यंत पोटचविल्याने अनेकांचे प्राण वाचविलेले आहेत.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 
         

कोणतेही शासकीय अनुदान नसतानाही रात्रीचा दिवस करून प्रसंगी बऱ्याचदा जीव धोक्यात घालून हे पथक प्रामाणिकपणे आपत्ती व्यवस्थापनाचे काम करीत आहे. अतिशय कष्टाळू, मेहनती आणि मनापासून झपाटून काम करणाऱ्या या पथकाला आतापर्यंत पुणे जिल्ह्याशिवाय कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, नगर, सोलापूर आदी परजिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर मागणी असते. कोणत्याही प्रकारचा अपघात असो, या पथकाला रात्री अपरात्री फोन केला की ते तुमच्या सेवेशी हजर असतात. अगदी निःस्वार्थी भावनेने, सामाजिक बांधिलकी जपणारे, माणुसकी बाळगणारे हे पथक मुळशीसाठी नक्कीच गौरवाची बाब आहे. 
 

जिल्हास्तरावर हक्काचे आणि कधीही फोन केला तरी तातडीने प्रतिसाद देणारे पथक म्हणून मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथकाचे कौतुक करावे थोडेच आहे. या पथकातील प्रमुख प्रमोद बलकवडे स्वतः एक एक्स्पर्ट असून, अन्य सगळेच सदस्य सदैव सज्ज असतात. या पथकाने आतापर्यंत अनेक मृतदेह पाण्याबाहेर काढल्याने त्यांना आता खाचाखोचा माहीत झाल्या आहेत. रात्री अपरात्रीही फोन केला तरी तातडीने प्रतिसाद देणारे जिल्ह्यातील हे पथक नक्कीच कौतुकास पात्र आहे. 
 - विठ्ठल बनोटे
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, पुणे

देशसेवा समजून निःस्वार्थीपणे काम केल्याचे समाधान मोठे आहे. पंढरपूरला वारकऱ्यांची सेवा म्हणजे साक्षात पांडुरंगाची सेवा करायला मिळणार आहे.
 - प्रमोद बलकवडे,
अध्यक्ष, मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथक  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com