गॅस टँकर उलटल्याने
द्रुतगती मार्गावर कोंडी

गॅस टँकर उलटल्याने द्रुतगती मार्गावर कोंडी

Published on

लोणावळा, ता. ३ : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास प्रोपिलीन या ज्वलनशील वायूने भरलेला टँकर अचानक उलटला. सुदैवाने यात कसलीही जीवितहानी झाली नाही, मात्र मध्यरात्रीपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
या घटनेची माहिती मिळताच बोरघाट पोलिस, महामार्ग पोलिस, देवदूत आपत्कालीन यंत्रणा, विविध स्वयंसेवी संस्था तसेच खोपोली नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टँकर मुंबईच्या दिशेने जात होता. बोगद्याजवळ तीव्र उतार व वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बोगद्याच्या प्रवेशद्वारापाशीच टँकर उलटला. त्यातून वायुगळती सुरू झाल्याने नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात आल्या. यासाठी खास तज्ज्ञांचे पथक बोलाविण्यात आले. कोंडीमुळे तज्ज्ञांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व परिसर सुरक्षित करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.

सात ते आठ किमी रांगा
वायुगळती सुरू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. संभाव्य धोका लक्षात घेता सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडील वाहतूक तत्काळ पूर्णतः बंद करण्यात आली. त्यामुळे द्रुतगती मार्गावर लोणावळ्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ब्लॉक घेत वाहने राष्ट्रीय महामार्गावरील पर्यायी मार्गाने वळविली. त्यामुळे जुन्या महामार्गावरही कोंडी झाली. तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले. दोन्ही मार्गांवर वाहनांच्या सात ते आठ किलोमीटर रांगा लागल्या होत्या.
---
फोटो
05176

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com