Mumps : आठ वर्षांखालील मुलांमध्ये वाढतोय ‘गालगुंड’

पॅरामिक्झोव्हायरस विषाणू संसर्गामुळे होणाऱ्या गालगुंडाचे रुग्ण पुण्यात वाढत आहेत, असे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
Mumps
Mumpssakal

पुणे - पॅरामिक्झोव्हायरस विषाणू संसर्गामुळे होणाऱ्या गालगुंडाचे रुग्ण पुण्यात वाढत आहेत, असे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. आठ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुला-मुलींमध्ये याचे प्रमाण लक्षणीय आहे, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले. या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी ‘एमएमआर’ लसीकरण करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

गालगुंड संसर्गजन्य आजार आहे. चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंच्या लाळग्रंथींवर (पॅराटिड ग्लॅण्ड) परिणाम करतो. विषाणू संसर्गामुळे या ग्रंथींना सूज येते. त्यामुळे कानाच्या खालचा जबडा व गाल फुगलेले दिसतात. शाळा आणि ‘डे केअर सेंटर्स’ आणि कोरोना उद्रेकात लसीकरणाचे वेळापत्रक चुकल्याने हा आजार होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

अंकुरा हॉस्पिटलच्या बालरोगतज्ज्ञ डॉ. शिल्पा बाविस्कर म्हणाल्या, ‘‘सध्या विषाणुजन्य ताप, डेंग्यू आणि डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. अलीकडे, गालगुंड याचाच भाग बनला आहे.

सामान्य लक्षणांमध्ये चेहऱ्याच्या एका किंवा दोन्ही बाजूंच्या ग्रंथींना सूज येणे, प्रभावित क्षेत्राभोवती वेदना होणे, तोंडाच्या कानाच्या खालच्या बाजूस ग्रंथींना सूज येणे, ताप, डोकेदुखी, थकवा, अंगदुखी आणि भूक कमी होणे यांचा समावेश होतो. नोव्हेंबरच्या अखेरीस आठ वर्षांखालील मुलांमध्ये हा आजार वाढत आहे. दररोज बाह्यरुग्ण विभागात एक ते दोन लहान मुलं उपचारासाठी येत आहेत.

लसीकरणाचा डोस चुकल्याने अनेक मुलांना हा त्रास होत असल्याचे आढळून येत आहे. हा विषाणू हवेतून आणि लाळेद्वारे पसरतोय. बहुतेकदा शाळा आणि ‘डे केअर्स’सारख्या ठिकाणी संसर्गाचा प्रसार होतो. खेळणी, कप आणि भांडी यांसारख्या लाळेने संक्रमित वस्तूंच्या माध्यमातून गालगुंड पसरू शकतो. लसीकरण केलेल्या मुलांमध्ये गालगुंड हा सामान्यतः एक सौम्य आजार असला, तरी त्याचा परिणामाने श्रवणशक्ती कमी होऊ शकते.’’

काय काळजी घ्यावी?

  • पालकांनी संसर्ग झालेल्या मुलांना शाळेत तसेच घराबाहेर पाठवू नये.

  • किमान ७ ते ८ दिवस ही काळजी घ्यावी

  • ‘एमएमआर’ लसीकरणाला प्राधान्य देणे आणि लशींशी संबंधित अफवांकडे लक्ष न देणे गरजेचे

  • भरपूर पाणी प्यावे

  • आम्लयुक्त पदार्थ टाळावे

  • सुजलेल्या ग्रंथींवर थंड बर्फाने किंवा गरम पाण्याच्या पिशवीने शेकावे.

  • डॉक्टरांच्या सल्ल्याने मुलांना व्हिटॅमिन ‘सी’ आणि झिंक सप्लिमेंट्स द्याव्यात.

गोवर, गालगुंड आणि रुबेला (एमएमआर) लसीकरणाचे वेळापत्रक विस्कळित झाल्यामुळे आणि कोरोना उद्रेकानंतर रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे गालगुंडाचे प्रमाण वाढले आहे. याचा परिणाम अनेक लहान मुलांवर होताना दिसून येत आहे. गालगुंडामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्‍भवू शकतात. परंतु, प्रत्येक रुग्णाला ही समस्या असेलच असे नाही. हे एक अत्यंत दुर्मीळ लक्षण आहे. या विषाणुजन्य आजारावर कोणताही निश्चित इलाज नाही. त्यामुळे हा आजार झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. सुश्रुत देशमुख, कान-नाक-घसा तज्ज्ञ, अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com