Pune : महापालिका प्रशासन ठेकेदारावर मेहरबान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation

महापालिका प्रशासन ठेकेदारावर मेहरबान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात समान पाणी पुरवठ्याच्या कामासाठी ठेकेदाराकडून रस्ते खोदाई सुरू असताना येथे सुरक्षेच्या नियमांचे पालन केले जात नाहीच, शिवाय काम झाल्यानंतर व्यवस्थित खड्डे बुजविले जात नाहीत. रस्त्यांची चाळण होत आहेत. तरीही महापालिका प्रशासन या ठेकेदारावर मेहरबान आहे. चुकीच्या पद्धतीने काम झाले तर त्यावर दंडात्मक कारवाई करणे अपेक्षीत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागासह सर्वच रस्त्यांची वाट लागलेली असताना केवळ १ कोटी ९० लाख ३३ हजार ४८६ रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

पुणे शहराची लोकसंख्या वाढत असताना दरवर्षी पाण्याचा वापर देखील वाढत आहे. पण वितरण व्यवस्थेतील गोंधळामुळे काही भागात दिवसभर तर काही भागात अवघे अर्धा ते एक तास असा असमान पाणी पुरवठा होत आहे. शिवाय जलवाहिन्यांमधून ४० टक्के पाणी गळती होऊन वाया जात आहे. महापालिकेने मीटर बसवलेले नसल्याने नेमके कोणत्या भागात किती पाणी जाते, कुठे जास्त वापर होत आहे याचा हिशोब लागत नाही. यासाठी महापालिकेने २१०० कोटी रुपयांची ‘समान पाणी पुरवठा योजना’ राबविण्यास सुरवात केली.

महापालिकेने या योजनेसाठी १७०० किलोमीटर लांबीची जलवाहिन्या शहरात टाकण्याचे ‘एल अँड टी’ कंपनीला दिला आहे. आत्तापर्यंत सुमारे ५३० किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, आत्तापर्यंत झालेल्या कामाबाबत नागरिक, नगरसेवक यांच्या अनेक तक्रारी महापालिकेकडे आलेल्या आहेत. रस्ते खोदाई करताना बॅरिगेट लावून, कामाची माहिती देणारा फलक लावणे आवश्‍यक आहे, पण ही माहिती दिली जात नाही.

रस्ता खोदून जलवाहिनी टाकल्यानंतर त्यावर माती ऐवजी खडी टाकून सिमेंटने रस्ता दुरुस्त करणे आवश्‍यक आहे. पण सध्या काही ठिकाणी फक्त माती टाकली जात आहे. तर काही ठिकाणी खडी कमी टाकून त्यावर सिमेंट टाकले जात आहे. त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे होऊन काही दिवसांनी सिमेंट टाकलेला रस्ता खचत आहे. ५३० किलोमीटरच्या खोदकामात नागरिकांना हाच त्रास प्रकर्षाने जाणवत आहे.

loading image
go to top