व्यापारी तत्त्वासाठी वापरणार महापालिकेची इमारत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

व्यवस्थेसाठी चार पर्याय

 • नवीन व जुनी इमारत यामध्ये विविध विभागांचे नियोजन करण्याबाबत चार पर्याय ठेवले आहेत. 
 • सर्व पदाधिकारी, आयुक्त, विभागप्रमुख जुन्या इमारतीत आणि उर्वरित विभाग नवीन इमारतीत
 • सर्व पदाधिकारी जुन्या इमारतीत आणि आयुक्त व सर्व विभागप्रमुख नवीन इमारतीत
 • स्थायी समिती सभापती वगळून सर्व पदाधिकारी जुन्या इमारतीत आणि आयुक्त, सर्व विभागप्रमुख, स्थायी समिती सभापती नवीन इमारतीत
 • सर्व पदाधिकारी, सर्व अधिकारी नवीन इमारतीत आणि सध्याच्या इमारतीचे नूतनीकरण करून अन्य कारणांसाठी वापर करणे.

दृष्टिक्षेपात नवी इमारत

 • पार्किंग : तळघरातील दोन मजले, त्यावर नऊ मजले 
 • तळमजला : ३०० क्षमतेचा बहउद्देशीय हॉल, पत्रकार कक्ष
 • पहिला व दुसरा मजला : राजकीय पदाधिकारी
 • तिसरा मजला : आयुक्त कक्ष
 • चौथा ते सातवा मजला : शहर अभियंता, इतर विभागप्रमुख
 • आठवा मजला : प्रशासन विभाग
 • नववा मजला : कर्मचारी व ट्रेनिंग सेंटर

पिंपरी - औद्योगिक ते निवासी (आय टू आर) धोरणानुसार ताब्यात आलेल्या पिंपरीतील जागेवर महापालिकेसाठी नऊ मजली नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. सध्याच्या चार मजली इमारतीचे नूतनीकरण करून ती व्यापारी तत्त्वावर देण्यात येणार आहे. नव्या इमारतीला ऐतिहासिक रूप देण्यात येणार असून, या प्रकल्पाचे सादरीकरण वास्तुविशारद उषा रंगराजन यांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांसमोर केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेची सध्याची इमारत पुणे-मुंबई महामार्गालगत पिंपरी व मोरवाडी चौकादरम्यान आहे. त्यामागे महिंद्रा कंपनीजवळील ‘आर टू आर’अंतर्गत मिळालेल्या जागेवर नवीन इमारत बांधण्याचे नियोजन आहे. जुनी इमारत व्यापारी तत्त्वावर देऊन त्या रकमेतून नवीन इमारतीच्या कामासाठी महापालिकेस निधी मिळणार असल्याचा दावा केलेला आहे. या इमारतीसाठी सुमारे २९९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. इमारतीची रचना ऐतिहासिक असेल. आवारात शहराचे शिल्पकार अण्णासाहेब मगर यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal building to be used for commercial purposes