पुणेकरांवर करवाढीचा बोजा 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 January 2020

शहराच्या विकासातील जुन्या आणि मोजक्‍याच नव्या योजनांचा समावेश करीत गायकवाड यांनी अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सोपविला.

पुणे - उत्पन्न वाढीला हमखास हातभार लावणाऱ्या मिळकतकर आणि पाणीपट्टीत वाढ सूचवित 6 हजार 229 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प (2020-21) महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी मांडला. उत्पन्नातील सततची घट आणि नव्या स्त्रोतांचा शोध न लागल्याने नव्यांऐवजी जुनेच प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्याचा संकल्प केल्याचे अर्थसंकल्पात दिसून येत आहे. दुसरीकडे, मेट्रो, "एचसीएमटीआर', "टू-व्हिलर फ्री वे' करीत वाहतूक सुधारण्यावर भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, नव्या पुरवणी अर्थसंकल्पाची कल्पना आणून, प्रकल्प आणि त्याचा निधी वाया जाऊ नये, याचाही प्रयत्न केला आहे. 

शहराच्या विकासातील जुन्या आणि मोजक्‍याच नव्या योजनांचा समावेश करीत गायकवाड यांनी अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सोपविला. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते दिलीप बराटे यांच्यासह पदाधिकारी-अधिकारी उपस्थितीत होते. 

गेल्या वर्षी तत्कालीन आयुक्त सौरभ राव यांनी 6 हजार 85 कोटींचा अर्थसंकल्प मांडला होता. त्यात 144 कोटी रुपयांची वाढ करीत गायकवाड यांनी सुचविलेल्या यंदाच्या अर्थसकंल्पात मिळकतकरात 12 टक्के, तर पाणीपट्टीत 15 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यातून वर्षभरात 164 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची आशा प्रशासनाला आहे. मात्र, स्थायी समितीने ही वाढ मंजूर केल्यानंतरच हे उत्पन्न मिळणार आहे. 

पुणेकरांना चोवीस तास पाणी पुरवणाऱ्या योजनेसह भामा आसखेड, कचरा व्यवस्थापनासाठी आखलेले प्रकल्प, मैलापाणी शुद्धीकरणाचे "जायका' या महत्त्वाकांक्षी योजनांमधील अडथळे दूर करून त्या मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पात नियोजन केले आहे. भूसंपादनाअभावी रखडलेले रस्ते, उड्डाण पूल आणि अन्य वाहतूक उपाययोजनाही मार्गी लावण्यावर भर देण्यात आला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात छोटी वाहने आणून वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत. 

शहराचा विकास करताना हातात पैसे असणे अपेक्षित आहे. त्यानुसार प्रकल्पांचे नियोजन होऊ शकते. त्या अनुषंगाने यंदा अर्थसंकल्प सादर केला आहे. ते अधिक वस्तुस्थितीला धरून आहे. 
- शेखर गायकवाड, आयुक्त, महापालिका 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Commissioner Shekhar Gaikwad Budget 2020-21 presented on Monday