कोंढवा परिसरातील पाच इमारतींवर हातोडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

 बेकायदा इमारती पाडण्याचे सत्र सुरू असतानाही अशा प्रकारे बांधकाम करणाऱ्यांना धडा शिकविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. नोटिसा बजावूनही बांधकामे न थांबविल्याने कोंढवा परिसरातील पाच बेकायदा इमारती पालिकेने बुधवारी पाडल्या.  

पुणे - बेकायदा इमारती पाडण्याचे सत्र सुरू असतानाही अशा प्रकारे बांधकाम करणाऱ्यांना धडा शिकविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. नोटिसा बजावूनही बांधकामे न थांबविल्याने कोंढवा परिसरातील पाच बेकायदा इमारती पालिकेने बुधवारी पाडल्या.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याची मोहीम महापालिकेने उघडली आहे. विशेषत: उपनगरांत विनापरवाना बांधकामे केली जात असल्याचे उघड झाले आहे. त्याची पाहणी करून बांधकामे रोखण्याबाबतच्या नोटिसा संबंधितांना देण्यात येत आहेत. तरीही, काही भागांमध्ये अशी बांधकामे सुरूच असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा इमारती पाडण्यात येत आहेत. धायरी, वडगाव, लोहगाव, मुंढव्यापाठोपाठ आता कोंढव्यातील बेकायदा इमारती पाडण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख म्हणाले, ‘‘परवानगी नसलेल्या बांधकामांना नोटिसा देण्यात येत आहेत; परंतु, त्या गांभीर्याने न घेता बांधकामे केली जात आहेत. त्यामुळे अशी बांधकामे पाडण्यात येत आहेत. कोंढव्यात सुमारे दहा हजार चौरस फूट जागेवरची बांधकामे पाडली. सर्वच भागांत ही कारवाई सुरू राहील.’’

शहरातील नव्या बांधकामांची परवानगी आणि प्रत्यक्ष बांधणी याची खातरजमा करून लोकांनी घरे खरेदी करावीत, असे आवाहन महापालिकेने केले आहे. कारवाईदरम्यानही घरे विकण्याचे प्रकार होऊ शकतात. त्यात आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे संबंधित बांधकामाचे नकाशे, परवाने तपासल्याशिवाय नागरिकांनी घरे खरेदी करू नयेत, असेही युवराज देशमुख यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: municipal corporation destroyed five illegal buildings in Kondhwa area