
पीओपीच्या मूर्ती विक्रेत्यांवर कारवाईसाठी महापालिकेने मागतिले मार्गदर्शन
पुणे - महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाने (एमपीसीबी) पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या गणेशमुर्तींवर बंदी घातली आहे. पण यावर कारवाई कशी करावी यावर स्पष्टता नसल्याने महापालिकाच गोंधळात पडली आहे. त्यामुळे महापालिकेने प्रदूषण महामंडळाला पत्र लिहून कारवाई कशी करायची याबद्दल मार्गदर्शन मागितले आहे.
गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्ती विक्री करण्याचे प्रमाण मोठे आहे. पीओपीची मूर्ती पाण्यात विरघळत नाही, त्यामुळे पर्यावरणास हानी पोहचत आहे. त्यामुळे पीओपीच्या मूर्तीवर बंदी घालण्यात आली आहे. एकीकडे मूर्तीवर बंदी घातली असली तरी दुसरीकडे पीओपीच्या मूर्ती तयार केल्या जात आहेत. या काळात मूर्ती विकणारे व्यावसायिक त्यांची बुकिंग करण्याच्या तयारीला लागले आहेत. या वर्षी पीओपीच्या मूर्तींना बंदी असल्याने महापालिकेने पीओपी मुर्ती विरघळण्यासाठी अमोनिअम बायोकार्बोनेट नागरिकांना मोफत वाटप केले जाते. पण यंदा याची खरेदी केली जाणार नाही असे महापालिकेने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. पण विक्रेत्यांवरील कारवाईबाबत संभ्रम आहे.
कारवाई कशी करावी, जप्त केलेल्या मूर्तींचे काय करावे, विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करायची आहे की अन्य पद्धतीने कारवाई करावी याची स्पष्टता नाही. त्यामुळे याबाबत एमपीसीबीला पत्र पाठवून कारवाई करण्यासाठी मार्गदर्शन करावे असे पत्र पाठवले आहे, अशी माहिती घनकचरा विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी दिली.
घनकचरा व अतिक्रमण विभागातही गोंधळ
पीओपीवरील मूर्ती विक्रेत्यांच्या दुकानावर कारवाई कोण करणार याबाबत स्पष्टता नाही. घनकचरा विभाग कारवाई करणार की अतिक्रमण विभाग करणार हे अद्याप ठरलेले नाही. या दोन्ही विभागात पीओपी बंदीवर बैठक झाली, पण कारवाईचे धोरण ठरलेले नाही.
Web Title: Municipal Corporation Sought Guidance For Taking Action Against Idol Sellers Of Pop
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..