महापालिकेची केशवनगर, मुंढव्यात बेकायदा बांधकामांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेची केशवनगर, मुंढव्यात बेकायदा बांधकामांवर कारवाई

शहरात गेल्या काही दिवसांत बेकायदा बांधकामे झाल्याच्या तक्रारी आहेत. त्याची दखल घेऊन कारवाई करण्यात येत आहे. गेल्या सात-आठ महिन्यांपासून महापालिकेच्या बांधकाम खात्यासह सर्व यंत्रणा कोरोनाविरोधात काम करीत आहे.

महापालिकेची केशवनगर, मुंढव्यात बेकायदा बांधकामांवर कारवाई

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - महापालिकेची यंत्रणा कोरोनाविरोधात लढत असताना अनेक ठिकाणी बेकायदा बांधकामे झाली. अशा बांधकामांवर महापालिकेने हातोडा उगारण्यास सुरवात केली आहे. मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये बेकायदा बांधकाम केलेल्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यानंतरही बांधकामे सुरूच राहिल्याने ती पाडण्याची मोहीम बुधवारी हाती घेण्यात आली. पूर्व भागांतील विशेषत: केशवनगर, मुंढव्यातील अशा इमारती जमीनदोस्त केल्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात गेल्या काही दिवसांत बेकायदा बांधकामे झाल्याच्या तक्रारी आहेत. त्याची दखल घेऊन कारवाई करण्यात येत आहे. गेल्या सात-आठ महिन्यांपासून महापालिकेच्या बांधकाम खात्यासह सर्व यंत्रणा कोरोनाविरोधात काम करीत आहे. याच काळात म्हणजे, लॉकडाउनमध्ये सवलती जाहीर झाल्यानंतर पुन्हा बांधकामे झाल्याचे दिसून आले. कमीतकमी जागेत तीन-चार मजले उभारणे, परवानगी न घेता बांधकाम करणे, कारवाईच्या भीतीपोटी घाईत कामे आटोपून बांधकामाचा दर्जा न राखल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर बांधकाम खात्याने बेकायदा बांधकामे रोखण्यावर भर दिला आहे.  दरम्यान, कारवाई करण्यापूर्वी बेकायदा बांधकाम का केले ?, ते करू नये तसेच परवानगी न घेता बांधलेली इमारत स्वत: पाडावी, अशा सूचनावजा नोटिसा महापालिकेने दिल्या आहेत. तरीही, त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बेकायदा बांधकामे निदर्शनाला आल्यानंतर किंवा तशा तक्रारी येताच संबंधितांना नोटिसा दिल्या आहेत. तरीही बांधकामे न थांबल्याने ती पाडण्यात येत आहेत. त्यामुळे परवानगी न घेता बांधकामे करू नयेत. सर्वच भागांत अशा प्रकारची मोहीम राबविणार आहे.
-प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका

उत्पन्नावर परिणाम
महापालिकेत समाविष्ट झालेल्या नव्या ११ गावांतही मोठ्या प्रमाणात बांधकामे थाटली गेल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ही बांधकामे वाढत गेली आहे. त्याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर होत असून, बांधकाम खात्याचा महसूल बुडत आहे.

loading image
go to top