महापालिका शाळांमधील शिक्षक ‘रडार’वर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

शाळेच्या वेळेत इतरत्र फिरणाऱ्या शिक्षकांची बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीवर परिणाम करणारी आहे. याबाबत यापूर्वी अनेकवेळा तोंडी सूचना देण्यात आलेल्या आहेत. पण, आता याबाबत मुख्याध्यापकांनाच परिपत्रकाद्वारे सूचित केले आहे. कार्यालयीन वेळेत वर्गाबाहेर आढळल्यास त्याच्यावर कारवाई होणार आहे. 
- ज्योत्सना शिंदे, प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग

पिंपरी - शालेय वेळेत अनेक शिक्षक अध्यापन सोडून वैयक्तिक कामांसाठी बाहेर फिरतात. तर काही जण कामानिमित्त शिक्षण विभागात पडीक असतात. त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत असल्याचा ‘साक्षात्कार’ शिक्षण विभागाला आता झाला आहे. उशिरा जाग आलेल्या शिक्षण विभागाने भटकंती करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याचा फटका दांडीबहाद्दर व कामचुकार शिक्षकांना बसणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिक्षण समितीच्या बैठकांमध्ये सातत्याने महापालिका शाळांमधील मुलांबद्दल तक्रारींचा पाढा वाचला जातो. अनेक लोकप्रतिनिधीच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्सना शिंदे यांनी तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली. परिपत्रकाद्वारे शाळेच्या वेळेत फिरणाऱ्या शिक्षकांना आता ‘टार्गेट’ केले आहे.

महापालिकेच्या १०३ मराठी, उर्दू, हिंदी व इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक शाळा कार्यरत असून, त्यासाठी एक हजार ७३ शिक्षक वर्ग कार्यरत आहेत. पण, अनेक शाळांमध्ये शिक्षक वर्गात उपस्थित नसतात. ते अन्यत्र फिरत असतात. काही जण कामानिमित्त शिक्षण विभागातच असतात. सकाळी वेळेत न येणारे शिक्षक, न सांगता अनुपस्थिती राहणारे, शाळा सुटण्याअगोदर निघून जाणे, टाचन न काढणारे व गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षकांना लगाम घालणे आवश्‍यक आहे. त्यामुळे भटकंती करणाऱ्या शिक्षकांची धांदल उडणार आहे. शिक्षक शाळेच्या वेळेत शाळेत आहेत की बाहेर, कामानिमित्त बाहेर गेलेले शिक्षक कोठे आहेत, याची माहिती शिक्षण विभागाने मागविली आहे. 

..तरच सोडावा वर्ग 
कार्यालयीन कामकाजासाठी आवश्‍यक असेल तरच शिक्षक कर्मचारी यांनी शालेय वेळेपूर्वी अथवा शालेय वेळेनंतर कार्यालयाशी संपर्क साधावा. अपरिहार्य कारणास्तव एखाद्या शिक्षक कर्मचाऱ्यास कार्यालयात अथवा अन्य ठिकाणी उपस्थित राहावे लागणार असल्यास शालेय विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचे नियोजन करून शालेय फिरती रजिस्टरला नोंद घ्यावी. संबंधित मुख्याध्यापकांची रीतसर परवानगीशिवाय वर्ग सोडू नये, याची दक्षता घ्यावी. अपरिहार्य कारण वगळता शालेय वेळेत शिक्षक कर्मचारी कार्यालयात अथवा अन्यत्र आढळल्यास त्याच्यावर महापालिका अधिनियम १९४९ मधील कमल ५६ (२) नुसार प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal School Teacher Issue