Video : पुण्यातील टॉयलेटमधील 'तो' वडापाव अखेर बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

महिलांबरोबरच खाणाऱ्यांच्या आरोग्याशी खेळ
स्वच्छतागृह आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉलमध्ये एकाच दारातून महिला, स्टॉलधारकांकडील कामगार ये-जा करीत असल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम म्हणजे, महिला या स्वच्छतागृहाचा वापर करीत नसल्याचे उघड झाले. शिवाय, याच ठिकाणी खाद्यपदार्थ तयार करण्यात येत होते. त्यामुळे महापालिकेने महिलांसोबत खाद्यपदार्थ खरेदी करणाऱ्यांच्या आरोग्याचा खेळ केला, अशी प्रतिक्रिया नगरसेविका मनीषा लडकत आणि आरती कोंढरे यांची आहे.

पुणे - महिलांसाठीच्या ‘ती’ स्वच्छतागृहांत थाटलेली वडापावची दुकाने महापालिकेने सोमवारी बंद केली. त्याआधी महिला पदाधिकाऱ्यांनी जागेवर जाऊन स्टॉलला टाळे ठोकण्यास ठेकेदाराला भाग पाडले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महिलांसाठी ‘पीएमपी’च्या जुन्या बसगाड्यांत ‘ती’ टॉयलेट योजना अमलात आणली. या स्वच्छतागृहांच्या देखभालीचा खर्च परवडत नसल्याने बसमधील निम्म्या जागेत ‘कमर्शिअल ॲक्‍टिव्हिटी’ला परवानगी देण्याची मागणी ठेकेदाराने महापालिकेकडे केली.

पुण्यात महिलांच्या स्वच्छतागृहात मिळतोय वडापाव

ती मंजूर होण्याआधीच ‘ती’ स्वच्छतागृहांत अशा प्रकारचे स्टॉल थाटले होते. महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे न पुरविणाऱ्या पालिकेने खाद्यपदार्थांच्या स्टॉलकडे काणाडोळा करून महिलांची अडचण केल्याचे स्पष्ट झाले. या संदर्भात ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. सोमवारी महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्ष डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, डॉ. श्रद्धा प्रभुणे, स्वप्नाली सायकर, नीता दांगट, मंगला मंत्री, सुजाता शेट्‌टी यांनी स्टॉलची पाहणी केली.

अशी दिली परवानगी
स्वच्छतागृहांची उभारणी केलेल्या बसगाड्यांत अशा प्रकारे खाद्यपदार्थ विकता येणार नाहीत. त्यामुळे परवाने दिले जाणार नाहीत, असे अन्न व औषध प्रशासन विभागाने स्पष्ट केले होते. मात्र, सरकारमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही परवानगी घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

स्वच्छतागृहांमधील खाद्यपदार्थांचे स्टॉल बंद करण्याचा आदेश दिला आहे. त्यावर कार्यवाही झाली असून, सर्व दुकाने बंद केली आहेत. 
- ज्ञानेश्‍वर मोळक, सहआयुक्त, महापालिका 

या स्वच्छतागृहांवर जाहिरातींचे फलक लावत आहोत, असे भासवून हे स्टॉल सुरू केले होते. त्यामुळे महिलांना स्वच्छतागृहात जाता येत नव्हते. मुळात, या योजनेला परवानगी कोणी दिली त्याचा खुलासा अधिकारी करीत नाहीत. 
- डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, अध्यक्षा, महिला व बालकल्याण समिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: municipal vadapav issue

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: