महिलेला टोमणा मारल्याच्या संशयावरून एकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

महिलेला टोमणा मारल्याच्या संशयावरून एकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना रविवारी दुपारी तीन वाजता जनता वसाहतीमधील ९१ क्रमांकाच्या गल्लीमध्ये घडली.

पुणे - महिलेला टोमणा मारल्याच्या संशयावरून एकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना रविवारी दुपारी तीन वाजता जनता वसाहतीमधील ९१ क्रमांकाच्या गल्लीमध्ये घडली.

नागनाथ राजाराम कदम (वय ३६, रा. जनता वसाहत) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गणपत झगडे (वय ३७) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. कदम हे त्यांच्या कुटुंबीयांसह जनता वसाहतीमधील ९१ क्रमांकाच्या गल्लीमध्ये राहत, ते रंगकाम करत; तर आरोपी गणपत झगडे हादेखील जनता वसाहतीमध्ये राहायला आहे. कदम व झगडे यांची एकमेकांशी ओळख होती. झगडे याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वी कदम हे त्यांची पत्नी व मुलीसह जनता वसाहतीमधील रस्त्याने जात होते, त्या वेळी ते त्यांच्या पत्नीची चेष्टामस्करी करीत होते. तेव्हा, त्यांच्या मुलीने त्यांना आईची चेष्ट करू नका, ती खाली पडून तिला लागल्यास आपल्याकडे उपचाराला पैसे नाहीत. आपण दोन नंबरचे पैसे कमावीत नाही, असे सांगितले. त्या वेळी झगडे याच्याशी अनैतिक संबंध असलेली महिला तेथे होती. तिने कदम व त्यांच्या कुटुंबीयांची चर्चा ऐकली. ‘दोन नंबरचा पैसा’ हा टोमणा आपल्यालाच मारल्याचा संशय आल्याने तिने याबाबत झगडेला सांगितले. त्यानंतर चिडलेल्या झगडेने नागनाथच्या घरी येऊन त्यास शिवीगाळ केली. काहीही चूक केलेली नसताना झगडेने येऊन शिवीगाळ केल्यामुळे कदम यांनी त्याच्याविरुद्ध पोलिस चौकीत जाऊन तक्रार देऊ असे सांगितले, त्यामुळे झगडेने चिडून त्याच्याकडील लोखंडी गज कदम यांच्या डोक्‍यात घालून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेनंतर कदम यांना तत्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder in pune city