महिलांची छेडछाड केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून सरपंचाच्या पतीचा खून

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 January 2020

 महिलांची छेडछाड केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून सोनगाव (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री थोरात यांचे पती युवराज आबासाहेब थोरात (वय ५०) यांचा एकाने धारदार शस्त्राने वार करून खून केला.

डोर्लेवाडी - महिलांची छेडछाड केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून सोनगाव (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री थोरात यांचे पती युवराज आबासाहेब थोरात (वय ५०) यांचा एकाने धारदार शस्त्राने वार करून खून केला. सोनेश्वर मंदिर परिसरात बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार मकरसंक्रांतीनिमित्त गावातील महिला सोनेश्वर मंदिरात ओवासण्यासाठी जमा झाल्या होत्या. त्या वेळी तेथे काही तरुण उभे होते. त्यापैकी एकजण महिलांची छेडछाड करत होता. युवराज थोरात यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी संबंधित तरुणाला याबाबत जाब विचारला. त्यावरून चिडून जाऊन त्याने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यात थोरात यांचा जागीच मृत्यू झाला. 

दरम्यान, या घटनेनंतर गावातील संतप्त तरुणांनी २५ घरे पेटवून दिली. त्यानंतर बारामती ग्रामीण पोलिसांनी गावात येऊन पाहणी केली व बारामती नगरपालिकेच्या अग्निशमन दलाची गाडीला बोलावून आग आटोक्‍यात आणली. गावात तणावपूर्ण वातावरण असून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  याबाबतची फिर्याद दिलीच नसल्याने पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. त्यामुळे शवविच्छेदनही झाले नव्हते. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी गावात येऊन ग्रामस्थांशी चर्चा केली आणि आरोपीला तातडीने अटक करण्यात येईल, असे सांगितले. 

मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका 
युवराज थोरात यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयासमोर शोक सभा घेऊन जोपर्यंत आरोपीला अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of Sarpanch husband