दुपारी अचानक ‘धडाम’; घाबरून सोलापूरकर घराबाहेर

दुपारी अचानक ‘धडाम’; घाबरून सोलापूरकर घराबाहेर
Published on: 

‘गूढ आवाजा’ने सोलापूरकरांची घाबरगुंडी
जुळे सोलापूरसह अनेक भागांत स्फोटासारखा आवाज; जमीन हादरल्याचा भास

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १५ : शहरात आज (गुरुवारी) दुपारी पावणेतीनच्या सुमारास अचानक झालेल्या प्रचंड ‘धडाम’ आवाजाने अवघे सोलापूर शहर हादरले. जुळे सोलापूरसह विविध उपनगरांत स्फोट झाल्याप्रमाणे आवाज घुमला, तर काही क्षणांसाठी जमीन हादरल्याचा भास झाला. घरांच्या खिडक्या-दारे थरथरल्याने नागरिकांची घाबरगुंडी उडाली. नेमके काय घडले, हे पाहण्यासाठी अनेकजण घराबाहेर पडून रस्त्यांवर जमा झाले. मात्र, या रहस्यमय आवाजाचा उलगडा न झाल्याने शहरात भीतीसोबतच तर्कवितर्कांनाही उधाण आले.
दुपारपर्यंत शांत असलेल्या शहरात पावणेतीनच्या सुमारास अचानक मोठा गडगडाट झाला. तोफेचा गोळा फुटल्यासारखा हा आवाज इतका तीव्र होता की, काही क्षण नागरिकांना नेमके काय घडले, याचा अंदाजच आला नाही. सुरुवातीला सिलिंडरचा स्फोट झाला असावा किंवा एखादा मोठा अपघात घडला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, शहरातील विविध भागांतील नागरिकांनी एकाच वेळी अशाच प्रकारचा आवाज ऐकल्याचे सांगितल्याने संभ्रम आणखी वाढला.

सॉनिक बूम की भूगर्भातील हालचाल?
या गूढ आवाजामागील कारणाबाबत भूगर्भातील हालचालींमुळे हा आवाज झाला की हवेतील दाबातील बदलामुळे, याविषयी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. लढाऊ विमान अतिवेगाने उडताना निर्माण होणारा ‘सॉनिक बूम’ किंवा शहराबाहेर झालेला नियंत्रित स्फोट यामुळेही असा आवाज येऊ शकतो; मात्र कोणत्याही कारणाला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

चौकट...
पुन्हा तीव्र धक्के जाणवल्यास ही काळजी घ्यावी?
- इमारतीत असताना सुरक्षित ठिकाणी थांबावे. लिफ्टचा वापर न करता जिन्याने सुरक्षितपणे खुल्या जागेत जावे.
- परिस्थिती सुरक्षित असल्यास गॅस शेगडी आणि विद्युत उपकरणे बंद करावीत.
- खिडक्यांच्या काचा, जड फर्निचर आणि धोकादायक भिंतींजवळ उभे राहणे टाळावे.
- प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
- गरज भासल्यास स्थानिक पोलिस ठाणे किंवा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा.

चौकट...
भूकंपसदृश हालचालीची नोंद नाही
भारतीय हवामान खात्याच्या तांत्रिक विभागातील एस. पी. सिंह यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहर किंवा जिल्ह्यात दुपारी दोन ते तीन या वेळेत भूकंपसदृश हालचालीची कोणतीही नोंद झालेली नाही. शहरातील विविध भागांत प्रचंड ‘धडाम’ आवाज ऐकू आल्याच्या पार्श्वभूमीवर ही माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com