अखेर रहस्य उलगडले; 'या'मुळे बदलला होता 'लोणार'च्या पाण्याचा रंग!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 July 2020

- हॅलोआर्किया या सुक्ष्मजीवांमुळे पाण्याचे रंग बदलले.
- आघारकर संशोधन संस्थेत करण्यात आली होती पाण्याची चाचणी

पुणे : सुक्ष्मजीवांमुळेच लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग गुलाबी झाल्याचे आता सिद्ध झाले आहे. यासाठी लोणारमधील पाण्याच्या नमुन्यांची चाचणी व अभ्यास नुकताच पुण्यातील आघारकर संशोधन संस्थे (एआरआय) तर्फे करण्यात आला होता. तर 'हॅलोआर्किया' या सुक्ष्मजीवामुळे पाण्याचा रंग गुलाबी झाल्याचे यातून समोर आले आहे. 

जगप्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवराचे पाणी गुलाबी झाल्यामागचे नेमकं कारण शोधण्यासाठी वन विभागाच्यावतीने लोणारच्या पाण्याचे नमुने एआरआईला आणि नीरा या संस्थेला सुपूर्त करण्यात आले होते. या अभ्यासामध्ये एआरआयचे संचालक डॉ. प्रशांत ढाकेफळकर, डॉ. मोनाली रहाळकर, डॉ. कार्तिक बालसुब्रमण्यम आणि डॉ. सुमीत डागर या शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला होता. 

कोरोनामुक्त झाल्यानंतर महापौर पुन्हा कामावर हजर; कोरोनाविरुद्ध नव्या लढाईचे दिले संकेत!​

याबाबत माहिती देताना डॉ. कार्तिक म्हणाले, "वन विभागातर्फे लोणारच्या चार वेगवेगळ्या भागातील पाण्याचे नमुने देण्यात आले होते. तसेच या पाण्याची चाचणी करताना हॅलोआर्किया जीवाणू व 'ड्युनेलिएला सॅलीना' शेवाळ हे दोन सूक्ष्मजीव आढळले. यामध्ये हॅलोआर्कियाचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले. पाण्यातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे सुक्ष्मजीवाणू रंगद्रव्य तयार करतात व त्यामुळेपाण्याचे रंग लाल किंवा गुलाबी दिसते. यंदा उन्हाळ्यात या सरोवराच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने पाण्यातील क्षारांचे प्रमाण आणि पीएचमध्ये वाढ झाल्यामुळे हॅलोआर्कियासाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली."

पुणेकरांनो, आतातरी भानावर या; मृतांच्या आकड्याने ओलांडलाय १ हजाराचा टप्पा!​

'एआरआय'मार्फत लोणार पाण्याच्या चाचणीबाबतचा अहवाल वन विभागाला पाठविण्यात आला आहे. दरम्यान पाण्याच्या रंगात झालेला बदल हा मानवी हस्तक्षेपामुळे नसून पूर्णपणे नैसर्गिक कारणांमुळे झाला असल्याचे डॉ. ढाकेफळकर यांनी सांगितले.

हॅलोआर्किया व ड्युनेलिएलाच्या डीएनएचा अभ्यास 
लोणार सरोवराच्या पाण्याचे रंग हॅलोआर्किया आणि ड्युनेलिएला या शेवाळमुळे गुलाबी झाले असून या सुक्ष्मजीवांचे संपूर्ण वर्गीकरण करण्यासाठी त्यांचा अभ्यास सुरू आहे. त्यांची प्रजाती कोणती आहे यासाठी एआरआयच्या शास्त्रज्ञांच्या वतीने या सुखमजीवांच्या डीएनएचा अभ्यास करण्यात येत असल्याचे डॉ. कार्तिक यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

"पाण्याचे विश्लेषण करताना पाण्याच्या क्षारांचे प्रमाण 6.5 टक्के तर पीएच 9.8 झाल्याचे समोर आले. तर यंदा लोणार सरोवरात फ्लेमिंगोंनी (रोहित पक्षी) हजेरी लावली होती. या पक्ष्यांच्या पंखांचा व पायांचा रंग हा देखील हॅलोआर्कियाद्वारे सोडण्यात आलेल्या रंगद्रव्यांमुळे येतो असे समजले जाते. तसेच हे पक्षी बाहेरून आपल्यासोबत काही वेगळ्या जातीचे हॅलोआर्किया घेऊन आले असावेत आणि त्यामुळे पाण्यातील हॅलोआर्कियाचे प्रमाण वाढले असावे असा अंदाज आहे. फ्लेमिंगो आणि हॅलोआर्कियाच्या संख्येत वाढ यात काही संबंध आहे का? यावर अभ्यास सुरू आहे."
- डॉ. मोनाली रहाळकर, शास्त्रज्ञ, एआरआय

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The mystery of the pink color of Lonar Lake was revealed