पुरंदर तालुका पंचायत समितीच्या सभापतिपदी नलिनी लोळे

पुरंदर तालुका पंचायत समितीच्या सभापतिपदी नलिनी लोळे

सासवड (जि. पुणे) : पुरंदर तालुका पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या नलीनी हरीभाऊ लोळे यांची आज बिनविरोध निवड झाली. पं.स. सभागृहातील 8 पैकी 6 सदस्य शिवसेनेचे असून, सेनेकडे दोन महिला सदस्य होत्या. त्यातून शिवसेना नेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी श्रीमती लोळे यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. तसेच उपसभापतिपदी प्रा. डाॅ. गोरक्षनाथ माने (सर) यांची निवड झाली. 

सासवडचे प्रांत प्रमोद गायकवाड हे निवडणुकीच्या विशेष सभेचे पीठासन अधिकारी होते. त्यांनी दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचे दुपारी दोन वाजता सभा सुरु झाल्यानंतर जाहीर केले. यावेळी तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुधीर भागवत, सहायक गट विकास अधिकारी मिलिंद मोरे, जि.प. सदस्य दिलीप यादव, ज्योती झेंडे, शालीनी पवार, मावळते सभापती रमेश जाधव, मावळते उपसभापती दत्ता काळे, सदस्य अर्चना जाधव, अतुल म्हस्के, शिवाजी पवार, राजाभाऊ झेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.  

नूतन सभापती नलीनी लोळे या भिवडी पंचायत समिती गणातून निवडून आल्या असून, पानवडीच्या त्या माजी सरपंच आहेत. तर नूतन उपसभापती प्रा. डाॅ. गोरक्षनाथ माने हे नीरा पंचायत समिती गणातून निवडून आले आहेत. दोन्ही सदस्यांना संधी देण्याचा निर्णय काल रात्री शिवसेना नेते व माजी राज्यमंत्री शिवतारे यांनी घेतला. त्यांच्या वतीने शिवसेनेचे तालुका प्रमुख दिलीप यादव यांनी नूतन पदाधिकाऱयांचा सत्कार केला. शिवसेनेचा यावेळी जल्लोष झाला.

पंचवार्षिक निवडणुकीनंतर शिवसेना पक्षांतर्गत पहिले सभापती अतुल म्हस्के झाले. तर पद सर्वसाधारण असतानाच महिला सदस्या अर्चना जाधव (वीर पं. स. गण) व पाठोपाठ रमेश जाधव (दिवे पं. स. गण) यांना सभापती करण्याचा निर्णय शिवतारे यांनी घेतला होता. शिवसेनेच्या गोटातून सूर होता. त्याप्रमाणे आज श्रीमती लोळे यांना सभापतिपद व प्रा. माने यांना उपसभापतिपद मिळाले.

तालुका पंचायत समिती सभागृहातील एकूण आठ सदस्य जागांपैकी शिवसेना सहा व काँग्रेस दोन असे बलाबल असल्याने शिवसेनेचे एकहाती वर्चस्व आहे. शिवसेना नेते तथा माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचेच पुन्हा एकहाती वर्चस्व राहील्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.

यावेळी बोलताना सभापती लोळे म्हणाल्या., मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवतारे यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील काळात महाविकास आघाडी सरकारकडून जास्तीत जास्त निधी मिळेल. 

सभापती नलीनीताई यशस्वी `तनिष्का`

'सकाळ' माध्यम समूहाच्या 'तनिष्का' व्यासपीठाचा गट आपल्या पानवडी (ता. पुरंदर) गावात स्थापन करुन नूतन सभापती नलीनी लोळे यांनी गावात गेल्या चार वर्षात लोकसहभागातून व 'सकाळ रिलीफ फंडा'ची मदत घेऊन जलसंधारणाचे मोठे काम उभे केले आहे. त्यातून व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी सरपंच तथा पती हरीभाऊ लोळे यांच्या सहकाऱ्यातून हे गाव आता समृद्ध होत आहे. लवकरच पर्यावरणयुक्त `कृषी पर्यटन` गाव म्हणून नावारुपाला येत आहे. तर प्रा. डाॅ. माने यांच्या रुपाने उच्चशिक्षित उपसभापती पं.स.ला मिळाला आहे.    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com