सेक्‍सटॉर्शन'च्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्या टोळीच्या सुत्रधाराला राजस्थानातून अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sextortion

तरुणांना मैत्रीच्या जाळ्यात ओढून त्यांना बदनामीची (सेक्‍सॉटर्शन) भिती घालत खंडणी उकळणाऱ्या राजस्थानमधील टोळीच्या मुख्य सुत्रधाराला पुणे पोलिसांच्या पथकाने अटक केली.

Sextortion : सेक्‍सटॉर्शन'च्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्या टोळीच्या सुत्रधाराला राजस्थानातून अटक

पुणे - फेसबुक, इन्स्टाग्राम, टिंडर अशा समाजामाध्यमांद्वारे तरुणांना मैत्रीच्या जाळ्यात ओढून त्यांना बदनामीची (सेक्‍सॉटर्शन) भिती घालत खंडणी उकळणाऱ्या राजस्थानमधील टोळीच्या मुख्य सुत्रधाराला पुणे पोलिसांच्या पथकाने अटक केली. शहरातील दत्तवाडी व सहकानरगर येथील दोन तरुणांनी बदनामीच्या भितीने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. या पार्श्‍वभुमीवर दत्तवाडी पोलिसांनी हि कारवाई केली आहे.

अन्वर सुबान खान (वय 29, रा. गुरुगोठडी, लक्ष्मणगढ, अलवर, राजस्थान) असे अटक केलेल्या मुख्य सुत्रधाराचे नाव आहे. दत्तवाडी भागातील एका तरुणाला समाजमाध्यमातून एका अनोळखी तरुणीने मैत्रीची विनंती पाठविली होती. तिने त्यास मैत्रीच्या जाळ्यात ओढल्यानंतर त्यास छायाचित्र समाजामाध्यमात प्रसारीत करुन बदनामीची धमकी देऊन त्याच्याकडून खंडणी उकळली होती. या घटनेनंतर तरुणाने दहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर आणखी एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या पार्श्‍वभुमीवर संबंधित गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या सुचना पोलिसांना देण्यात आल्या होत्या.

समाजमाध्यमावर छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संशयित आरोपींच्या विरोधात दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दत्तवाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. आरोपी राजस्थानातील असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे एक पथक राजस्थानात गेले होते. तेथील गुरुगोठडी गावात सापळा रचून पोलिसांनी त्यास अटक केली. तत्पुर्वी आरोपी व त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर दगडफेक करीत त्यांच्या कारवाईला विरोध केला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे, पोलिस उपनिरीक्षक अक्षय सरवटे, काशीनाथ कोळेकर, जगदीश खेडकर, अनुप पंडीत, सूर्या जाधव यांच्या पथकाने हि कारवाई केली.

गावातील अनेकजण गुन्ह्यात सहभागी

राजस्थानमधील लक्ष्मणगढ तालुक्‍यातील गुरुगोठडी या गावातील तरुण मुले, महिला "सेक्‍सटॉर्शन'च्या नावाने देशभरातील तरुणांना आपल्या जाळ्यात ओढत होते. त्यांच्याकडूनच संबंधित तरुणांचा मानसिक छळ करुन त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जात होते. त्यातुनच पोलिसांनी अन्वर खान यास अटक केली, तेव्हा गावातील अनेकजण अशा पद्धतीने गुन्हे करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

...तर पोलिसांशी संपर्क साधा!

मैत्रीच्या जाळ्यात ओढून या टोळीने देशभरातील अनेकांकडून पैसे उकळले होते. अशा प्रकारे फसवणूक झाल्यास नागरिकांनी न घाबरता दत्तवाडी पोलीस ठाण्यात (दूरध्वनी 020 -24220201) तक्रार करावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी केले आहे.