Pune Loksabha Voting : हजारो मतदारांची नावे यादीतून गायब

‘गेल्या २५ वर्षांपासून मतदान करतो, पोटनिवडणुकीतही मतदान केले; पण आता नाव गायब झाले, हे कसे काय?’, कसब्यातील रहिवासी वैभव गांधी तावातावाने बोलत होते.
Pune Loksabha Voting
Pune Loksabha Votingsakal

पुणे : ‘गेल्या २५ वर्षांपासून मतदान करतो, पोटनिवडणुकीतही मतदान केले; पण आता नाव गायब झाले, हे कसे काय?’, कसब्यातील रहिवासी वैभव गांधी तावातावाने बोलत होते. आश्चर्य म्हणजे त्यांच्या पत्नीचे नाव मतदार यादीत; मात्र गांधी यांचेच नाव गायब झालेले, त्यांचा अधिकाऱ्यांशी वादही झाला. परंतु त्यांना मतदान करता आले नाही. त्यामुळे ते संतप्त झाले होते. गांधी यांच्या सारखी हजारो उदाहरणे सोमवारी पुण्यात दिसून आली. त्याचे कारण होते सदोष मतदारयाद्या.

गांधी यांना मतदान करता आले नाही, त्यामुळे ‘सकाळ’ कार्यालयात येऊन त्यांनी त्यांचे म्हणणे मांडले. निवडणूक आयोगाचे ओळखपत्र हे शोभेचे ठरले आहे, अशीही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. हेरंब रहाळकर यांनाही असाच अनुभव आला. त्यांच्या ८५ वर्षांच्या आईचे मतदारयादीत नाव कायम होते. यंदाच ते वगळले गेले, त्याबद्दल रहाळकर चिडले.

सहकारनगरमधील दीपक मुनोत यांच्याकडेही निवडणूक आयोगाचे ओळखपत्र आहे. अनेक निवडणुकांत त्यांनी मतदान केले. परंतु यंदा त्यांचे नाव गायब झाल्याचे दिसून आले. ताडीवाला रस्ता परिसरात राहणारे अल्ताफ नदाफ यांच्या कुटुंबातील सहा जणांची, तर मीना शेडगे यांच्याही कुटुंबातील सर्वांची नावे गायब झाल्याचे दिसून आले. त्याच परिसरात राहणाऱ्या वनिता बनसोडे यांच्या कुटुंबातील काही सदस्यांची नावे नसल्याचे दिसून आले.

अशाप्रकारे हजारो नागरिकांनी नावे गायब झाल्याच्या तक्रारी केल्या. एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या ठिकाणच्या मतदार केंद्रांवर गेली होती; तर काहींच्या बाबतीत पुरुष मतदारांच्या नावापुढे महिलेचे छायाचित्र होते. त्यामुळे त्यांनाही मतदान करता आले नाही. काही सोसायट्यांतील नावेही वेगवेगळ्या केंद्रांवर होती. निवडणूक आयोगाचे ओळखपत्र असूनही नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. त्यामुळे मतदारयाद्या तातडीने दुरुस्त्या कराव्यात, अशी मागणी बाणेरमधील मतदार राजेश वागळे यांनी केली.

Pune Loksabha Voting
Lok Sabha Election Voting : उत्साहात मतदान ; राज्यात अनेक ठिकाणी टक्केवारी वाढली

मृतांची नावे यादीत, तर जिवंत मतदार गायब

फरिदा शेख-खान यांच्या कुटुंबातील मृत मतदारांची नावे यादीत होती. तर हयात असलेल्या मतदारांची नावे नव्हती. यात फरिदा यांचेही नाव नव्हते. त्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही.सोलापूर बाजार भागातील शंकर वायदंडे यांचे नाव होते, परंतु त्यांच्या पत्नीचे नाव नव्हते. त्यांनी डॉ. आंबेडकर मेमोरिअल टेक्निकल हायस्कूलच्या केंद्रातील अधिकाऱ्याकडे विचारणा केली, परंतु त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

पतीऐवजी पत्नीचे छायाचित्र

गुलशन लजपतराय खत्री यांच्या मतदारचिठ्ठीतील नावासमोर त्यांच्या पत्नीचे छायाचित्र होते. नावासमोर महिला असा उल्लेख होता. त्यांनी मागील विधानसभा निवडणुकीत मतदान केले होते. परंतु यावेळी नाव नसल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.

तीन तास वाया गेले

मीनाक्षी सुनील खंडाळे यांनी सांगितले की, ‘‘मला मतदानाची चिठ्ठी मिळालेली नव्हती, पण मुलाला मिळाली होती. भवानी पेठेतील काशेवाडी येथील गोल्डन ज्युबिली इन्स्टिट्यूटमध्ये नाव तपासले असता तेथे आढळले नाही. मग मी जवळच्या हरकानगरमधील महर्षी हरकादास विद्यामंदिरमधील केंद्रावर नाव शोधले. मात्र तिथेही नाव सापडले नाही. यात तीन तास वाया गेले. कामावर जाण्याची घाई असल्यामुळे मतदान करता आले नाही.’’

मतदारयादीत नाव सापडत नसल्याने केंद्रावर जाऊन नाव शोधण्याचा प्रयत्न केला, पण सापडले नाही. ज्या केंद्रावर मी अनेक वर्षे मतदान करते तिथे आमच्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांची नावे होती, माझे नव्हते. याबाबत विचारणा केली; मात्र त्यांनी नकार दिल्याने मत न देताच घरी यावे लागले. हे अत्यंत खेदजनक आहे.

- सावनी रवींद्र, गायिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com