न संपणारं आठवपर्व

न संपणारं आठवपर्व
Published on: 

न संपणारं आठवपर्व
- डॉ. प्रकाश आमटे

नाना (नाना पाटेकर) गेल्याचं आज सकाळी कळलं तेव्हा त्याच्या आठवणीनं मन विषण्ण झालं. मन पुन्हा १९८० च्या दशकात गेलं. माझे वडील कर्मयोगी बाबा आमटे चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा इथं आनंदवन निर्माण करून कुष्ठरोग्यांसाठी नंदनवन फुलवत होते. तेव्हा एका नाट्यप्रयोगासाठी दिग्दर्शिका विजया मेहता यांच्यासोबत चंद्रपूरात आलेला नाना सहज भेट द्यायला आला. बाबांची भेट घेऊन त्यांना थेट म्हणाला, ‘मला तुमच्या आनंदवनातच रहायचं आहे.’ त्यांनी नानाला वडीलकीच्या नात्यानं समजावलं. म्हणाले, ‘तू एक उत्तम कलाकार आहेस, त्या क्षेत्रातच वेगळी ओळख निर्माण कर. समाजातील गोरगरीबांसाठीा जमेल तशी आर्थिक मदत कर.’ बाबांचा हा सल्ला नानाला पटला आणि त्यानं अभिनयाच्या वाटेवर राहूनच समाजकार्याला हातभार लावला.
पुढं २०१२ मध्ये चित्रपट निर्मात्या, दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांनी माझ्यावरील चित्रपटाचा संकल्प सोडला. त्यांनी माझी भूमिका नानालाच दिली. त्यासाठी तो एक महिना हेमलकसामध्येच राहिला. नानाला स्वयंपाकाचाही नाद होता. त्यानं सोबत आपले खास कोकणी मसाले आणले होते. मग कधी ढोबळी मिरची, कधी पिठलं-भाकर कधी वेगळे चविष्ट पदार्थ तो करायचा आणि आम्हालाही प्रेमानं खाऊ घालायचा. मागे २०२५ च्या शेवटी त्याच्याशी व्हिडिओ कॉलवरून बोलणे झाले होते. आता जानेवारीत ७५ पूर्ण होतील तुला, असं म्हटल्यावर, ''अरे वय वाढायला काय अक्कल लागते का?'' असं नेहमीच्या बेधडक अंदाजात बोलला.'' इतक्यात पुण्याला येणार नाही असं म्हटल्यावर ‘मीच येईल भामरागडला’ असं तो बोलला होता.
आता पुन्हा आनंदवन, हेमलकसाच्या माहेरओढीनं नानाची पावलं आमच्या अंगणात पडणार नाहीत, त्याचा दमदार आवाज इथं घुमणार नाही. पण त्याचं न संपणारं आठवपर्व तर आमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकणार नाही.

- डॉ. प्रकाश आमटे, ज्येष्ठ समाजसेवक, लोकबिरादरी प्रकल्प (हेमलकसा), गडचिरोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com