

पुणे, ता. ११ : ग्रंथप्रसाराला चालना देण्यासाठी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी ११ मे १८७८ला सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरवले. हेच पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन! ही साहित्य संमेलनाची परंपरा आता शतकपूर्तीपर्यंत आली असताना हिराबागेतच पहिले ‘नांदी साहित्य संमेलन’ होणार आहे. साहित्य संमेलनाच्या परंपरेचे एक वर्तुळच यानिमित्ताने पूर्ण होणार आहे.
जानेवारी २०२७ मध्ये पुण्यात शंभरावे साहित्य संमेलन होणार आहे. त्यापूर्वी महाराष्ट्र, बृहन्महाराष्ट्र आणि परदेशांमध्ये देखील एकूण ९९ नांदी साहित्य संमेलने होतील. त्यातील पहिले नांदी साहित्य संमेलन हिराबाग येथील ज्योत्स्ना भोळे सभागृहात शुक्रवारी (ता. १४) सकाळी १० ते दोन या वेळेत होणार आहे. हे संमेलन फक्त विशेष निमंत्रितांसाठी असेल, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे आणि या संमेलनाचे सहसंयोजक असलेल्या महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सागर देशपांडे यांनी दिली.
महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था या न्यायमूर्ती रानडे यांच्याच प्रेरणेतून स्थापन झाल्या असल्याने या नांदी संमेलनात न्या. रानडे यांच्यावरील एक नाट्यप्रवेश सादर होणार आहे. यावेळी ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख, ज्येष्ठ हास्यचित्रकार शि. द. फडणीस या शतायुषी दिग्गजांचा ज्येष्ठ मूर्तीशास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येईल. तसेच, शतकोत्तर परंपरा असलेल्या पुण्यातील काही संस्थांचा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात येईल, असे सोमण यांनी सांगितले.
पहिल्या नांदी संमेलनाची वैशिष्ट्ये
- प्रथम संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती रानडे यांना अभिवादन करून पहिल्या ‘नांदी साहित्य संमेलना’ला सुरुवात
- ९९व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ‘पानिपत’कार विश्वास पाटील हेच पहिल्या नांदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
- पुण्यात वास्तव्यास असलेले माजी संमेलनाध्यक्ष उपस्थित राहणार
- पूर्वार्धात सन्मान सोहळा आणि अध्यक्षीय भाषण
- उत्तरार्धात ‘सत्यशोधक महात्मा’ या दीर्घांकाचे सादरीकरण
...अशी सुरू झाली साहित्य संमेलनाची परंपरा
ग्रंथप्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने तसेच त्यावर एकत्र येऊन विचार-विनिमय करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने १८७८च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ‘ज्ञान प्रकाश’मध्ये प्रसिद्ध झाले. या आवाहनानुसार ११ मे १८७८ला हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. न्या. रानडे यांनीच त्याचे अध्यक्षपद भूषविले. शंभरावे संमेलन होत असताना साहित्य संमेलनांच्या परंपरेला उजाळा मिळावा, या उद्देशाने याच ठिकाणी पहिले नांदी संमेलन होत आहे.
संमेलने झालेल्या ठिकाणीच नांदी संमेलने
पहिल्या नांदी साहित्य संमेलनाप्रमाणेच अन्य नांदी साहित्य संमेलने देखील यापूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालेल्या सर्व ठिकाणी होणार आहेत. यात घुमान, दिल्ली, बडोदा अशा सर्व स्थळांसह महाराष्ट्रातील सर्व संमेलनस्थळांचाही समावेश असेल. शंभरावे साहित्य संमेलन होत असताना यापूर्वीच्या ९९ संमेलनांच्या परंपरांना उजाळा मिळावा, हा यामागील उद्देश आहे. त्याचप्रमाणे सिंगापूर, सिडनी, दुबई अशा बारा विविध देशांमध्ये आणि महाराष्ट्रासह बारा राज्यांमध्ये ठिकठिकाणी नांदी साहित्य संमेलने होतील, अशी माहिती समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.