

पुणे, ता. १४ : प्रेम, मैत्री, नाती आणि आयुष्यातील छोट्या-मोठ्या अनुभवांवरच्या शायरीने रसिकांना कधी हसवले, तर कधी भावुक केले. प्रत्येक शायरीनंतर उमटणारी ‘वाह वाह’ची दाद, टाळ्यांचा कडकडाट आणि कलाकारांसोबत गाण्यांमध्ये सहभागी होणारे प्रेक्षक, यामुळे मैफिलीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. काही क्षण हलकेफुलके विनोद आणि प्रेक्षकांशी साधलेल्या संवादाने रंगले, तर काही क्षण मनाला भिडणाऱ्या कवितांनी भारावून टाकले. मैत्री, मानसिक आरोग्य, मनातील भावना आणि आयुष्याचा प्रवास अशा विषयांनाही या सादरीकरणातून स्पर्श करण्यात आला.
‘सकाळ लिट फेस्ट’मध्ये आयोजित ‘नायाब लाइव्ह’ या कार्यक्रमात कवयित्री आणि शायरा नायाब मिधा यांनी आपल्या खास शैलीत शायरी सादर केली. त्यांना सहकलाकार अर्जन सिंग यांनी गिटार आणि गायनाची साथ दिली. नायाब यांच्या शायरीला अर्जन यांच्या सौम्य अकौस्टिक गिटारची जोड मिळाल्याने सादरीकरणाला वेगळीच रंगत आली.
कार्यक्रमाची सुरुवात ‘फर्ज करो’ या नज्मने झाली. त्यानंतर प्रेम, आकर्षण, मैत्री आणि नात्यांमधील भावविश्व अशा विविध विषयांवरील रचना सादर झाल्या. ‘लग जा गले’, ‘अफरीन अफरीन’, ‘एक अजनबी हसीना से’ यांसारख्या लोकप्रिय गीतांनी वातावरण अधिक सुरेल केले. ‘यारों दोस्ती’ आणि ‘तेरे जैसा यार कहाँ’ या गाण्यांत प्रेक्षकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. समारोपाच्या वेळी नायाब यांनी आयुष्यात केवळ ध्येय गाठण्यापेक्षा प्रवासही सुंदर बनवण्याचा संदेश दिला. शायरी, संगीत आणि संवाद यांचा सुरेख संगम साधणारी ही मैफल रसिकांच्या स्मरणात राहणारी ठरली.