esakal | राज्यकर्त्यांना वठणीवर आणा - अजित पवार

बोलून बातमी शोधा

राज्यकर्त्यांना वठणीवर आणा - अजित पवार
राज्यकर्त्यांना वठणीवर आणा - अजित पवार
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नारायणगाव - ‘‘सरकारच्या शेतकरीविरोधी भूमिकेमुळे राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. व्यापारीसुद्धा आत्महत्या करत आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. देशात व राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. प्रशासनावर सरकारची पकड राहिलेली नाही. हुकूमशाही राज्य करणाऱ्या मस्तवाल राज्यकर्त्यांना वठणीवर आणण्यासाठी हे सरकार बदला,’’ असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

कांदळी (ता. जुन्नर) येथील अंजली मंगल कार्यालयात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी  अजित पवार बोलत होते. या वेळी त्यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच, सदस्य, गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. 

या वेळी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष अतुल बेनके, जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, सभापती संजय काळे, अनिल मेहेर, शरद लेंडे, रमेश भुजबळ, विनायक तांबे, सरपंच विक्रम भोर, मोहित ढमाले, अंकुश आमले, राजश्री बोरकर, देवराम मुंढे, शिवाजीराव बढे, बाजीराव ढोले, विलास पाटे, भाऊ कुंभार आदी उपस्थित  होते.

अजित पवार म्हणाले, ‘‘राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचे सभागृहात दिलेले आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी पाळले नाही. बोगस कर्जमाफी दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतमाल व साखरेचे भाव कोसळले असताना साखरेची व तुरीची आयात करून शेतकरी, सहकार उद्‌ध्वस्त करण्याचे काम केले जात आहे. गुजरातचे दूध राज्यात आणल्यामुळे दूध उत्पादक अडचणीत सापडला आहे. हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देऊ शकणार नाही. देशाच्या विकासदरात घट झाली आहे. उद्योग बंद पडल्याने लाखो लोक बेरोजगार झाले आहेत.’’

‘‘सर्वसामान्य कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत. पक्षाच्या जिवावर मोठे झालेले तालुक्‍यातील काही नेते विरोधकांच्या व्यासपीठावर जाऊन दुटप्पी राजकारण करत आहेत. निष्ठेने काम करायचे नसेल; तर पक्ष सोडून चालते व्हा. पक्षविरोधी काम करणाऱ्यांना या पुढे व्यासपीठावरून हाकलून दिले जाईल,’’ असा इशारा अजित पवार यांनी दिला. 

‘भाजप सरकारचा पराभव निश्‍चित’
वळसे पाटील म्हणाले, ‘‘सत्तेसाठी एकत्र आलेल्या भाजप व शिवसेनेच्या नेत्यांमध्ये ताळमेळ नसल्याने राज्यातील विकास मंदावला आहे. पोटनिवडणुकीत भाजपविरोधी वातावरण तयार झाले आहे. रोजगाराचा अभाव, शेतमालाला भाव नाही, यामुळे राज्याला बुरे दिन आले आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप सरकारचा पराभव निश्‍चित आहे.’’ सूरज वाजगे यांनी आभार मानले. 

जाती-जातींत तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचे काम भाजप सरकार करत आहे. हुकूमशाही पद्धतीच्या कारभारामुळे शेतकरी, उद्योजक, व्यापारी अडचणीत सापडले आहेत. सरकारच्या कारभाराविषयी सर्व समाजात नाराजी आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या भाववाढीमुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे.
- अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री