esakal | Narayangaon : टॉमेटो क्रेटला उच्चांकी ८५० रुपये भाव
sakal

बोलून बातमी शोधा

 टॉमेटो क्रेटला उच्चांकी ८५० रुपये भाव

नारायणगाव : टॉमेटो क्रेटला उच्चांकी ८५० रुपये भाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव टोमॅटो उपबाजारात आज चांगल्या प्रतीच्या टोमॅटो क्रेटला ८५० रुपये उच्चांकी भाव मिळाला. महिन्याभरापूर्वी टाकून दिल्या जाणाऱ्या हलक्या प्रतीच्या भुगी टोमॅटो क्रेटला ३०० ते ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.

गेल्या दोन दिवसांत टोमॅटो क्रेटच्या भावात दोनशे रुपयांची वाढ झाली आहे. पावसामुळे नुकसान झाल्याने आवक घटल्याने व कोरोनानंतर बाजारपेठ पूर्व पदावर येत असल्याने मागणी वाढून टोमॅटो, कांदा व इतर भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. मागील वर्षभरानंतर भाव वाढीचा फायदा शेतकऱ्यांना मिळत आहे, अशी माहिती सभापती संजय काळे यांनी दिली. जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील टोमॅटोचा उन्हाळी व पावसाळी तोडणी हंगाम दोन महिन्यापूर्वी संपला आहे. या वर्षी मार्च ते ऑगस्ट दरम्यान टोमॅटो क्रेटला ५० रुपये ते २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कमी भाव मिळाल्याने या वर्षीचा टोमॅटो हंगाम तोट्यात गेला.

हेही वाचा: खामगाव : यंदा पाच प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग; पावसाचे प्रमाण अधिक

सध्या उशिरा लागवड झालेल्या बिगर हंगामी टोमॅटोची जुन्नर, आंबेगाव तालुक्यातून व बारामती, शिरूर तालुक्यातून उपबाजारात रोज सात ते दहा हजार क्रेट आवक होत आहे. रोज पंचवीस हजार क्रेटची मागणी आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत उपबाजारात कमी आवक होत असल्याने टोमॅटो खरेदीसाठी व्यापाऱ्यांमध्ये चढाओढ होत आहे. या मुळे टोमॅटो उत्पादकांना वाढीव भाव मिळत आहे. बिगर हंगामी लागवड केलेल्या उत्पादकांना टोमॅटोची लॉटरी लागली आहे, अशी माहिती व्यापारी जालिंदर थोरवे, योगेश घोलप, दत्ता शिंगोटे यांनी दिली.

२७ जून रोजी दीड एकर क्षेत्रात आर्यमान या जातीच्या टोमॅटोची लागवड केली होती. आज अखेर दोन हजार क्रेट उत्पादन निघाले आहे. पावसामुळे टोमॅटोचे नुकसान झाल्याने उत्पादन कमी निघाले. मात्र, येथील उपबाजारात प्रतवारीनुसार टोमॅटो क्रेटला ३०० ते ७५० रुपये भाव मिळाला. त्यामुळे सुमारे पाच लाख रुपयांचा नफा झाला आहे. अजून तीन ते चार तोडे होतील.

- अतुल घोलप, टोमॅटो उत्पादक, खामगाव (ता. जुन्नर)

loading image
go to top