esakal | नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपींविरोधात १३ पुरावे न्यायालयात सादर
sakal

बोलून बातमी शोधा

pune

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपींविरोधात १३ पुरावे न्यायालयात सादर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीविरोधात तेरा पुरावे केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे (सीबीआय) आज न्यायालयात सादर करण्यात आले.

घटनास्थळाचा पंचनामा, मृत्यूची कारणे, मृत्यूची वैद्यकीय सूचना, फॉरेन्सिक प्रयोगशाळांचे अहवाल, आरोपी संजीव पुनाळेकर यांच्या कार्यालयातून दोन लॅपटॉप जप्त केल्याचा आणि आरोपींच्या छायाचित्रांचा मेमो यासह तेरा पुराव्यांचा त्यात समावेश आहे. गुन्हेगारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम २९४ नुसार, खटल्याशी संबंधित कागदपत्रांची यादी सीबीआयने विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सादर केली. गुन्ह्यातील पाच डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर ही आरोप निश्चिती करण्यात आली. आरोपींनी मात्र गुन्हा कबूल नसल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यामुळे आता सरकार व बचाव पक्षातर्फे पुराव्यासंबंधीची कागदपत्रे सादर केली जाणार होती. त्यानुसार हे पुरावे सादर करण्यात आले.

सीबीआयने सादर केलेल्या कागदपत्रांपैकी कोणती कागदपत्रे मान्य आहेत, हे बचाव पक्षातर्फे पुढील सुनावणीत सांगितले जाणार आहे. त्यानंतर सरकार पक्षातर्फे साक्षीदारांची यादी (लिस्ट ऑफ विटनेस) सादर केली जाणार आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी दिली. या सुनावणीला आरोपी डॉ. तावडे आणि न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे औरंगाबादमधील हर्सूल मध्यवर्ती कारागृहातून स्थलांतरित केलेला आरोपी सचिन अंदुरे हे दोघे येरवडा मध्यवर्ती कारागृहातून, तर आरोपी शरद कळसकर मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते.

जामिनावर असलेले आरोपी अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे प्रत्यक्ष हजर होते. आरोपी कळसकर याला ताबडतोब येरवडा कारागृहात हलविण्याचे आदेश न्यायालयाने आर्थर रोड कारागृह प्रशासनाला दिले. आरोपींच्या वतीने अॅड. प्रकाश साळसिंगीकर यांनी बाजू मांडली. या प्रकरणाची पुढील सहा ऑक्टोबर रोजी होणार आहे.

केस डायरी सीलबंद स्वरूपात दिली जाणार

खटल्याच्या सुनावणीच्या सुरवातीस केस डायरी सीलबंद स्वरूपात देण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने २०१६ मध्ये राज्यातील सर्व सरकारी वकिलांना दिले होते. त्यानुसार, या प्रकरणातही सीलबंद स्वरूपात केस डायरी देण्याची मागणी बचाव पक्षातर्फे ॲड. प्रकाश साळसिंगीकर यांनी केली. विशेष सरकारी वकिलांनी हरकत न घेतल्याने ही मागणी मान्य करण्यात आली. पुढील सुनावणीस सरकार पक्षातर्फे केस डायरी सीलबंद स्वरूपात दिली जाणार आहे.

खटल्याच्या सुनावणीच्या सुरवातीस केस डायरी सीलबंद स्वरूपात देण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने २०१६ मध्ये राज्यातील सर्व सरकारी वकिलांना दिले होते. त्यानुसार, या प्रकरणातही सीलबंद स्वरूपात केस डायरी देण्याची मागणी बचाव पक्षातर्फे ॲड. प्रकाश साळसिंगीकर यांनी केली. विशेष सरकारी वकिलांनी हरकत न घेतल्याने ही मागणी मान्य करण्यात आली. पुढील सुनावणीस सरकार पक्षातर्फे केस डायरी सीलबंद स्वरूपात दिली जाणार आहे.

व्हीसीद्वारे वर्षश्राद्धासाठी हजर व्हावे

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याने वडिलांच्या वर्षश्राद्धासाठी प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी सादर केलेला परवानगी अर्ज विशेष न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाला हजर राहता येईल, अशी सूचना न्यायालयाने केली.

loading image
go to top