Vidhan Sabha 2019 : पुण्यात १७ ऑक्‍टोबरला नरेंद्र मोदी यांची सभा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 October 2019

विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचाराचा ज्वर चढणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात ९, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या १८ सभांमधून तोफा धडाडणार आहेत.

विधानसभा 2019

पुणे -  विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचाराचा ज्वर चढणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात ९, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या १८ सभांमधून तोफा धडाडणार आहेत. मोदी यांची १७ ऑक्‍टोबरला पहिली सभा साताऱ्यात होणार असून, त्यानंतर याच दिवशी पुण्यातही सभा होणार आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

भाजपने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यात मोदी आणि शहा यांना सर्वांत जास्त मागणी असून, शहर भापजनेही या दोघांच्या सभा व्हाव्यात यासाठी ‘प्रदेश’कडे मागणी केलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर कोथरूड येथे पाटील यांचा प्रचार सुरू असताना त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.

ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्र आणि हरियाना येथे एकाच वेळी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे या दोन्ही राज्यात भाजपचे नेते प्रचारासाठी जाणार आहेत. मोदी यांच्याही दोन्ही राज्यात सभा होणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रात ९ सभा होतील; तर शहा यांच्या १८ सभा घेण्याचे निश्‍चित झाले आहे.’’ 

सभांचे नियोजन सुरू करण्यात आले असून, त्यासाठी पुण्यातील जागेचा शोध सुरू आहे. राज्यातील इतर सभांच्या तारखा आणि वेळांचेही नियोजन सुरू आहे, असे पाटील यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi meetings on October 17 in Pune