

सकाळ वृत्तसेवा
सटाणा, (जि. नाशिक) ता. ८ : बिगरमोसमी पाऊस, गारपीट, वाढलेला उत्पादन खर्च आणि त्यातच कांद्याच्या बाजारभावातील अभूतपूर्व घसरण यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा आज सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत उसळला. कांद्याला अवघा ५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांदा भरलेला ट्रॅक्टर थेट बाजार समिती कार्यालयासमोर उभा करत तीव्र आंदोलन छेडले. परिस्थिती इतकी चिघळली की, संबंधित शेतकऱ्याने भर बाजारात गळ्यात दोर बांधून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.
कऱ्हे (ता. बागलाण) येथील शेतकरी जितेंद्र साळुंके यांनी मोठ्या अपेक्षेने कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणला होता. मात्र लिलावात त्यांच्या कांद्याला केवळ ५० रुपये प्रति क्विंटल दर जाहीर होताच ते संतप्त झाले. यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी कांदा भरलेला ट्रॅक्टर बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उभा करून ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलन सुरू असतानाच आर्थिक विवंचनेतून हतबल झालेल्या जितेंद्र साळुंके यांनी गळ्यात दोरखंड बांधून आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला.
यानंतर व्यापारी, बाजार समिती प्रशासन आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली. अखेरीस संबंधित कांद्याला १७५ रुपये प्रति क्विंटल वाढीव दर देण्याचे मान्य करण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.