esakal | बारामती कृषी महाविद्यालयाने रोवला देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा

बोलून बातमी शोधा

National Agricultural Research Board Peer Review Committee AccreditationBaramati Farm College}

राष्ट्रीय कृषी शिक्षण मंडळाच्या समितीने मागील तीन महिन्यापूर्वी बारामती कृषी महाविद्यालयाचे शैक्षणिक दृष्ट्या ठरवून दिलेल्या निकषानुसार विविध बाबींचे मुल्यांकन केले होते.

बारामती कृषी महाविद्यालयाने रोवला देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा
sakal_logo
By
कल्याण पाचांगणे

माळेगाव :  भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या २७ व्या परिषेदेतील बैठकीमध्ये राष्ट्रीय कृषी शिक्षण मंडळ (नॅशनल अॅग्रीकल्चरल एज्युकेशन अॅक्रॅडिटेशन बोर्ड) यांच्या पिअर रिव्हिव समितीने बारामती कृषी महाविद्यालयास अधिस्विकृती जाहीर केली. विशेषतः राज्यातील खाजगी कृषी महाविद्यालयामधून अशी अधिस्विकृती जाहीर होणारे एकमेव बारामतीचे कृषी महाविद्यालय आहे. अर्थात हे यश विचारात घेता बारामती महाविद्यालयाचा नावलौकिक देशभर गाजत आहे. 

राष्ट्रीय कृषी शिक्षण मंडळाच्या समितीने मागील तीन महिन्यापूर्वी बारामती कृषी महाविद्यालयाचे शैक्षणिक दृष्ट्या ठरवून दिलेल्या निकषानुसार विविध बाबींचे मुल्यांकन केले होते. या मुल्यांकन समितीचे अध्यक्ष डॉ . व्ही . एस तोमर, समिती सचिव एस. के. सरकार, डॉ. रश्मी अग्रवाल, डॉ. एम. के. झाला इत्यादींचा समावेश होता. दरम्यान, संबंधित समितीने मुल्यांकन करताना बारामती कृषी महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेल्या प्रशासकीय सोयीसुविधा, प्राध्यापक वर्ग  व त्यांचे योगदान,  तांत्रिक मनुष्यबळ, ग्रंथालयाच्या सोयीसुविधा, सर्व प्रयोगशाळा प्रात्यक्षिक वर्ग, डेअरी, पोल्ट्री इतर अत्याधुनिक प्रकल्प विचारात घेतले. तसेच येथील विद्यार्थ्यांसाठी असणारे स्किल डेव्हलपमेंटचे मोडयुल, स्मार्ट क्लासरूम, विद्यार्थी क्षमता, पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, प्रवेश प्रकिया, प्रात्यक्षिकातून अनुभव, परिक्षा आणि निकाल, राष्ट्रीय सेवा योजनेतील यश , क्रीडा सुविधा , उच्च दर्जाचे संशोधन,  विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणारे कल्चरल सेंटर, व्यक्तिमत्व विकासाचे अनेक उपक्रम आदी विषयांचे मुल्यमापन झाले.

विशेषतः या समितीने महाविद्यालयाच्या आंतरराष्ट्रीय कृषी अभ्यासकम्राच्या कार्यप्रणालीबद्दल समाधान व्यक्त केले.  तसेच यु. सी. डेव्हीस विद्यापीठ कॅलीफार्निया,  चिन मधील  युनान विद्यापीठ, कोस्टारीका येथील अर्थ विद्यापीठ, इस्त्राईल येथील हिब्रु विद्यापीठ, नेदरलँडमधील वाखनिंगम विद्यापीठ, व्ही , एच . एल . विद्यापीठ,  एशियन इनस्टियुट ऑफ टेक्नॉलॉजी ए.आय .टी. बँकॉक अशा विविध देशांशी असलेले सामंजस्य करार, तसेच बारामतीत उभारलेले व  देशातील पहिले भाजीपाला गुणवत्ता केंद्र, देशी गोवंश सुधारणा प्रकल्प, उती संवर्धन प्रयोगशाळा, शिक्षण क्षेत्राात नाविण्यपुर्ण तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या दृष्टीने महत्वपुर्ण ठरत असल्याचे मत समितीने नोंदविले आहे.

विशेष बाब म्हणजे बारामती कृषिमहाविद्यालयात राबवित असलेला अंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम हे संपुर्ण देशभर दिशादर्शक ठरत आहे.  त्यानुसार भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने नुकतेच  विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी)  मार्फत आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदवी अभ्यासक्रमाचे सामंजस्य कराराच्या दृष्टीने घटना केली. हे करत असताना बारामती कृषि महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमाचे रोल मॉडेल स्विकारल्याचे संबंधित मुल्यांकन समितीने नमूद केले.  कृषी महाविद्यालयात चालू असलेले निती आयोगाचे इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर,  स्टार्ट अप , विद्यार्थ्यांनी आणि स्टाफने मिळवलेले पेटंट, एंटरप्रेनर प्रकल्प, रोजगारांच्या संधी आदी बाबींना मुल्यांकन समितीने पसंती दिल्याचे स्पष्ट आहे. 


महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या डाॅ. एस.एन.पुरी समितीने गतवर्षी कृषी माहिविद्यालय बारामतीचे मुल्यांकन केले व महाविद्यालयाने सर्वाधिक ८४ गुण मिळून राज्यात प्रथम येण्याचा मान पटकविला. आता भारतीय कृषी अनुसंधाण परिषदे (नवी दिल्ली) च्या मुल्यांकन समितीच्या निकषातही महाविद्यालयाने देशभर नावलौकीक मिळविला आहे. या गोष्टीचा नक्कीच अभिनान वाटतो.  वास्तविक पहाता यंदा अॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्टचे सुर्वणमोहत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने बारामती कृषी महाविद्यालयाने मिळविलेले यश हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पवारसाहेबांना भेट म्हणून आम्ही देत आहोत. 
 - राजेंद्र पवार, प्रमुख-अॅग्रीकल्चर डेव्हलमेंट ट्रस्ट 


''गेली ११ वर्ष शिक्षण क्षेत्रात नाविन्यपुर्ण बदल करून बारामती कृषी महाविद्यालयाने अनेक प्रकल्प उदयास आणले. केंद्र व राज्य सरकार, विविध कंपन्या आणि अंतराष्ट्रीय शैक्षणिक संस्थांच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी इको सिस्टीमची निर्मिती केली. त्यामुळे प्राप्त झालेल्या या दैदिप्यमान यशाचे साक्षीदार होत असताना आम्हाला आनंद होत आहे. ''
- मुख्य कार्य़कारी अधिकारी - निलेश नलवडे 
.........
छायाचित्र ः mal05p2...बारामती- कृषी महाविद्यालय