esakal | निसर्ग चक्रीवादळ : मागणी ८८ कोटींची, मिळाले साडेदहा कोटी
sakal

बोलून बातमी शोधा

 चक्रीवादळ

निसर्ग चक्रीवादळ : मागणी ८८ कोटींची, मिळाले साडेदहा कोटी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी राज्य सरकारने पुणे विभागासाठी सुमारे साडेदहा कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून निसर्ग चक्रीवादळामुळे घरांची पडझड झालेल्या बाधित नागरिकांना तसेच मृत जनावरांच्या मालकांना अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सुमारे ८८ कोटी ७२ लाखांच्या मागणीचा अतिरिक्त प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

राज्यात ३ जून २०२० रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा काही जिल्ह्यांमध्ये बसला होता. या चक्रीवादळामुळे पुणे विभागातील जिल्ह्यांमध्येही शेतपिकांचे तसेच, घरांची पडझड झाल्यामुळे कपडे, भांडी आणि जीवनसामुग्रीची मोठी हानी झाली होती. या बाधितांना मदतीचे वाटप करण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी यापूर्वी प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार ७८ कोटी २८ लाख रुपये इतका निधी वितरित करण्यात आला. दरम्यान, या नैसर्गिक आपत्तीमधील बाधितांसाठी पुन्हा ८८ कोटी ७२ लाख रुपये अतिरिक्त निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यापैकी केवळ दहा कोटी ४४ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

हेही वाचा: पुणे : विकास धुमाळकडे १८ अपात्र केलेले प्रवेश अर्ज

नुकसान, मागणी आणि कंसात प्राप्त झालेला निधी रुपयांत

  • घरांच्या पडझडीमुळे भांडी, साहित्याचे नुकसान ११ कोटी ३७ लाख (८५ लाख ७० हजार)

  • मृत जनावरांसाठी मदत १० कोटी १२ लाख (२२ लाख)

  • पूर्णत: नष्ट आणि अंशत: पडझड झालेल्या घरांसाठी ४७ कोटी ९२ लाख (९ कोटी ५८ लाख)

  • शेतपिकांचे नुकसान २९ कोटी ३२ लाख (निधी नाही)

loading image
go to top