esakal | पुणे : विकास धुमाळकडे १८ अपात्र केलेले प्रवेश अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

crime

पुणे : विकास धुमाळकडे १८ अपात्र केलेले प्रवेश अर्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शासकीय कोट्यातून (आरटीई ) एका मुलीस पहिलीत प्रवेश मिळवून देण्यासाठी पालकाकडे ७० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पालक शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधीकडे १८ अपात्र केलेले प्रवेश अर्ज मिळाले आहेत. त्यातील काही प्रकरणात आर्थिक व्यवहार केल्याचे आणि त्यातील हिस्सा गटशिक्षणअधिका-यास दिल्याचे आरोपीने मान्य केले आहे.

या प्रकरणात हवेली पंचायत समितीच्या शिक्षणअधिका-‍यासह प्रवेश पडताळणी समिती सदस्यास अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. रामदास शिवनाथ वालझाडे (वय ५०, गटशिक्षणधिकारी, वर्ग २, पंचायत समिती ता. हवेली) आणि विकास नंदकुमार धुमाळ (वय ४०, प्रवेश पडताळणी समिती सदस्य, पालक शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी) अशी पोलिस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीसमोरील पदपथावर सापळा रचून एसीबीच्या पथकाने एक सप्टेंबर रोजी दुपारी ही कारवाई केली.

हेही वाचा: पोलिसांना मिळावी वेतनाच्या फरकाची रक्कम

मुलीस आरटीई शासकीय प्रवेश कोट्यातून पहिलीत प्रवेश मिळावा यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. मात्र, शिक्षण विभाग पंचायत समिती हवेली यांनी फिर्यादींच्या मुलीचा प्रवेश अर्ज अपात्र केला होता. म्हणून त्यांनी शिक्षण विभाग जिल्हा परिषद येथे अपील केले होते. फिर्यादींच्या घरी पालक शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी आणि धुमाळ आले. त्यांनी मुलीचे प्रवेश अर्ज पात्र करून देतो परंतु त्यासाठी ७० हजार द्यावे लागतील, असे सांगितले. मात्र, ही शासकीय फी नसून लाच असल्याचे लक्षात आल्याने तक्रारदाराने त्याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली होती.

हेही वाचा: विदर्भ : सर्वात महाग सिलिंडर गडचिरोलीत

अटक दोघांना गुरुवारी (ता.२) न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांचे आवाजाचे नमुने घेण्यासाठी, आरटीई प्रवेश संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अनेक तक्रारी प्राप्त असून त्यामध्ये आरोपीचा सहभाग आहे का याची पडताळणी करण्यासाठी, वालझाडे यांच्या अंगझडतीमध्ये बॅगेत ४५ हजार रुपये मिळाले असून त्याबाबत योग्य उत्तर दिलेले नसून त्याबाबत तपास करायचा आहे. यासाठी त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी केली. पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त विजयमाला पवार या करीत आहेत.

loading image
go to top