नवरात्रोत्सवाची मंगलमय सुरुवात

नवरात्रोत्सवाची मंगलमय सुरुवात
Published on: 

पुणे, ता. ११ : सनई चौघड्याचे सूर... ढोल-ताशांचा निनाद... संबळ, डफाचे वादन... उदे गं अंबाबाई... दुर्गा मातेचा जयघोष आज दिवसभरात सर्वत्र घुमला. शारदीय नवरात्राला मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला. घरोघरी घट बसवत नवरात्रीच्या उत्सवाची सुरुवात झाली. तर सार्वजनिक मंडळांमध्ये दुर्गा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मिरवणूक काढत रात्री उशिरापर्यंत करण्यात आली.
आदिशक्तीच्या आगमनाने वातावरणात चैतन्य पसरले आहे. उत्सवासाठी मंदिरांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट करण्यात आली आहे. नऊ दिवस रंगणाऱ्या या उत्सवासाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर श्रीसूक्ताचे स्वर मंडळाच्या मंडपांमध्ये, मंदिरांमधून ऐकू येत आहेत. रांगोळ्या, सुगंधी अगरबत्तीचा दरवळ याने वातावरण प्रसन्न झाले आहे. घरोघरी आणि मंडळांमध्ये घटांची विधिवत स्थापना करण्यात आली असून मंत्रोच्चारात कारळ्याच्या फुलांची माळ चढविण्यात आली आहे. दर दिवसाला या माळेमध्ये वाढ होते. तसेच नऊ दिवस अखंड नंदादीपही आज प्रज्वलित करण्यात आला. महिलांनी पारंपरिक वेषात घटाची पूजा करत आदिमायेच्या उत्सवाचे स्वागत केले. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचाच उत्साह दुणावला होता.
सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनीही उत्सवाची जय्यत तयारी केली आहे. देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना, आकर्षक मंडप, फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला आहे. काही मंडळांनी धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे नियोजन केले आहे. मंदिरांमध्ये सकाळ-संध्याकाळ आरती, भजन आणि देवीच्या स्तोत्रांचे पठण होणार असल्याने पुढील दिवस भक्तिमय वातावरणात रंगणार आहेत. ढोल-ताशांच्या गजरात, दिंडी सोहळा काढत तर गोंधळाच्या पारंपरिक गीतांमध्ये आदिमायेची प्रतिष्ठापना करण्यात आली असून विजयादशमीपर्यंत सोहळ्याचा उत्साह सर्वत्र दिसून येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com