Ajit Pawar : राजकीय आकसातून चौकशा नकोत!

ajit pawar
ajit pawarsakal

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची २१ एप्रिलला चिंचवडमध्ये ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस यांनी मुलाखत घेतली. यामध्ये पवार यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. प्रश्नोत्तरांचा सारांश :

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून गेल्या २४ वर्षांत पक्षाचे चार उपमुख्यमंत्री झाले. या पदाचे राष्ट्रवादीला इतके आकर्षण का?

अजिबात आकर्षण नाही. २००४ मध्ये मुख्यमंत्रिपद मिळेल इतक्या जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी संधी होती. राजकीय जीवनात वरिष्ठ पातळीवरून निर्णय घेतले जातात. पक्षशिस्तीसाठी ते पाळावे लागतात.

आमची काँग्रेसबरोबर आघाडी होती. राष्ट्रवादीला ७१ व काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या होत्या. मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे जाईल, अशी मानसिकता काँग्रेसमध्येही होती. विधिमंडळ नेते म्हणून आर. आर. पाटील यांची बहुमताने निवड झाली होती.

कदाचित तसा निर्णय झाला असता तर आर. आर. पाटील राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री झाले असते. परंतु संधी मिळाली नाही. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला कायम दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली, त्यामुळे उपमुख्यमंत्रिपद आमच्याकडे जास्त काळ राहिले.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्रिपदाचा दावा ठेवणार का?

२०२४ ला का? आता म्हटले तरी मुख्यमंत्रिपदासाठी क्लेम ठेवायची तयारी आहे.

छगन भुजबळ उपमुख्यमंत्री झाले त्यावेळी पक्षांतर्गत मतदानात उपमुख्यमंत्रिपदाचा कौल तुमच्या बाजूने होता?

अजिबात नाही. पक्षांतर्गत कौल लोकशाही पद्धतीने घेतला जातो. शरद पवार सांगतात, ‘‘दिल्लीचे निरीक्षक आले तरी आमदारांचा कौल काय याची चाचपणी घेऊन निर्णय घेतला जातो.’’ त्यावेळी छगन भुजबळ यांच्या बाजूने बहुमताचा कौल होता. शरद पवार यांच्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून काढायचे काम कोणी केले असेल, तर ते छगन भुजबळ यांनी. त्यामुळे तो त्यांचा मान होता.

पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे या मुख्यमंत्र्यांबरोबर तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. त्यांच्यासोबतचा तुमचा अनुभव कसा होता?

दोघांनाही आमदारकीचा अजिबात अनुभव नव्हता. १९९१ मध्ये मी व पृथ्वीराजबाबा प्रथम आणि एकाचवेळी खासदार झालो. त्यानंतर पृथ्वीराजबाबा कायम केंद्रातील राजकारणात राहिले. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचे केंद्रीय राज्यमंत्री म्हणूनही काम केले. २०१० ला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. तशाच पद्धतीने उद्धव ठाकरे यांनीही आमदार म्हणून कधीच काम केले नव्हते. चव्हाण यांच्याबरोबर चार तर ठाकरे यांच्याबरोबर अडीच वर्षे काम केले. ठाकरे यांच्याबरोबर आनंदाने, समाधानाने, आपलेपणाने काम केले, तर चव्हाण यांच्याबरोबर वरिष्ठ सांगतात म्हणून नाइलाजास्तव काम केले!

(एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर) उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा अचानक राजीनामा दिला. उपमुख्यमंत्री म्हणून तुम्हाला या राजीनाम्याची कल्पना होती का?

हे अचानक घडलेले नव्हते. महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून एकनाथ शिंदे यांच्याबाबत कायम कानावर यायचे. ते नाराज होते. काहीतरी शिजत होते, हे आम्हाला कळत होते. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या कानावर आम्ही घालत होतो. ते म्हणायचे आम्ही बोलतो. ‘काय रे, काही गडबड आहे का?’ असे विचारले तर कोणी सांगणार आहे का, की ‘माझ्या मनात गडबड आहे’ म्हणून? भाजप पहिल्या दिवसापासून आघाडी सरकार पाडण्यासाठी कार्यरत होते. एका नेत्याच्या धर्मपत्नीने त्यांचे पती वेशभूषा बदलून जात होते, असे सांगितले होते. ते कशासाठी जातात, हे त्यांनाही माहीत नव्हते. पण, ते कशासाठी जात होते हे नंतर कळले. ठाणे जिल्ह्यात कोण अधिकारी असावे, याचे अधिकार ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना विश्वासाने दिले होते. पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त व ग्रामीणचे एसपी यांच्या नियुक्तीचे काम ठाकरे यांची सही असली, तरी शिंदे यांनी केले होते. त्यामुळे शिंदे यांनी बंड केले तेव्हा त्यांनी दिलेले अधिकारी त्यांना ‘लॉयल’ राहिले. कोठे असतील तेथून गाड्या वळवून ‘वर्षा’वर आणा, असे ठाकरे यांनी सांगितले तरी, अधिकाऱ्यांनी त्यांना सुरतच्या रस्त्याला सुरक्षितपणे पोचविण्याचे काम केले!

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देताना तुमच्याशी, कोणाशी चर्चा केली होती का?

त्यांच्यावर प्रचंड प्रेशर होते. जिवाभावाचे सहकारी आपल्याला इतक्या मोठ्या संख्येने सोडून जातील, असे त्यांना वाटले नव्हते. त्यांना तो एक शॉक होता. पहिल्या टप्प्यात १५-१६ आमदार फुटले, सुरतला गेले. त्यावेळी दीपक केसरकर, उदय सामंत, दिलीप लांडे यांना आम्ही ‘वर्षा’वर पाहत होतो. नंतरच्या काळात या सगळ्यांना एकत्र ठेवण्याचे काम ज्याप्रमाणे २०१९ मध्ये मी व देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर तिन्ही पक्षांनी केले, तसेच काम झाले असते, तर ठाकरेच मुख्यमंत्री दिसले असते.

भाजपसोबत जावे म्हणणारा दबावगट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे का?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असा दबावगट अजिबात नाही. सेक्युलर, पुरोगामी महाराष्ट्र असे आपण बोलत असतो. परंतु तीन पक्ष एकत्र आले. वादग्रस्त विषयांना फाटा दिला. तिन्ही पक्षांची वेगळीवेगळी मते आहेत. परंतु, ठरल्यानुसार मतभेद न आणता किमान समान कार्यक्रमावर काम करायचे ठरले. शेवटच्या कॅबिनेटमध्ये उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली, की मला औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करायचे आहे. सगळ्यांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने नामकरण पार पडले.

महाविकास आघाडी सरकारचे काम तळागाळापर्यंत पोचवू शकला का? पुढच्या काळात ते कितपत शक्य आहे?

कार्यकर्त्यांना एकत्र आणल्याशिवाय आघाडी बळकट होणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यासाठी दौरे काढायचे ठरले होते. त्यानंतर कोरोनात दोन वर्षे गेली. यामध्ये ठाकरेही काहीकाळ आजारी होते. नंतर सरकार पडले. आता छत्रपती संभाजीनगर व नागपूरला सभा झाली. एक मे रोजी मुंबईत सभा आहे. वरिष्ठांच्या लाइननुसार कार्यकर्ते काम करत आहेत.

तुमची ‘दादागिरी’ची भाषा पहिल्यापासून आहे का?

माझी भाषा पहिल्यापासून तशी नाही. तशी भाषा वापरण्यासाठी आम्हाला प्रवृत्त केले जाते. उदाहरणार्थ माझी बहीण सुप्रिया सुळे, आमचे दैवत शरद पवार यांच्याबाबत पुरंदरमध्ये माजी राज्यमंत्री विजय शिवतारे खालच्या पातळीवर जाऊन टीका करत होते. पवारसाहेबांबर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. सुप्रिया सुळे उत्कृष्ट संसदपटू आहेत. महाराष्ट्राची परंपरा आहे, महिलांबाबत कसे बोलायचे. यामध्ये काही तारतम्य असते. जर कोणाला मस्ती आली, तर ती उतरविण्याची ताकद आपल्यात आहे.

तुमचे ‘परफेक्शन’ राजकारणातील अन्य सहकाऱ्यांमध्ये आणण्याचा तुमचा कितपत प्रयत्न आहे?

शरद पवार आमदार झाल्यापासून १९६७ पासून आम्ही त्यांना पाहत आलो आहे. पवारसाहेब आलेल्या लोकांशी कसे बोलतात, हे पाहिले. त्यातील जेवढे जमेल तेवढे करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. साहेब अनेकदा लगेच अधिकाऱ्यांना फोन लावून प्रश्न मार्गी लावतात. लोकांनी दिलेले निवेदन तेथेच टाकून जाणारे अनेक नेते मी बघितले आहेत. लोकांनी निवेदन आपुलकीने दिलेले असते. प्रत्येकाचे काम आपण शंभर टक्के करू शकणार नाही. जेवढा न्याय देता येईल, तेवढा देण्याचा मी प्रयत्न करतो. निवेदन बघितले तरी कळते, की हे काम होणार की नाही. लोकांना हेलपाटे मारायला लावण्यात काही अर्थ नाही. स्पष्ट बोलले तर लोकांना आवडते.

राज्यात एकच बारामती उभी राहिली. १५ वर्षे सत्तेत असताना राज्यात असा विकास इतरत्र का झाला नाही?

बारामती काही एका दिवसात उभी राहिली नाही. बारामतीच्या विकासासाठी १९६७ पासून शरद पवार, अप्पासाहेब पवार, सुप्रिया सुळे, राजेंद्र पवार व आम्ही अनेक सहकारी राबतो आहोत. पूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये लोक कामाला यायचे व राहायला पुण्यात जायचे. मग आम्ही ठरवले, की येथे एवढ्या सुविधा द्यायच्या की लोक पुण्यातून पिंपरी-चिंचवडला राहायला आले पाहिजेत. त्यानुसार नियोजन केले. शरद पवार यांचे मार्गदर्शन लाभले. ‘जेएनएनयूआरएम’चा निधी आणला. हे काम एक व्यक्ती म्हणून नाही तर टीम म्हणून करावे लागते. मनासारखे काम करण्यासाठी झोकून देऊन काम करणारी टीम असावी लागते. पिंपरी-चिंचवड, पुण्यासह अनेक मतदारसंघांत विकासाची कामे सुरू आहेत. सरकार गेले नसते, तर चित्र बदलले असते.

तुम्हाला शेतीची जाण आहे. महाराष्ट्र सहकाराची जननी आहे. तरीही महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतात, ४८ टक्के साखर कारखाने खासगी झाले असे का?

विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने सहकारी साखर कारखान्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेतला. उसाचे पीक जादा होत असल्याने पाणी जादा जाते. माधवराव चितळे समितीचाही तसा अहवाल होता. मोठ्या प्रमाणात उसाचे पीक झाले, तर भविष्यात दुष्परिणाम होतील, असा सूर त्यावेळी होता. शरद पवार यांनी राज्यात फलोत्पादन योजना, शेततळी योजना आणल्या होत्या. त्यांनी अन्नधान्यात देश स्वयंपूर्ण करण्याची किमया केली. म्हणून सहकारी साखर कारखान्यांना राज्य सरकारने परवानगी द्यायची नाही, असे ठरले. नंतर कोणीही हे धोरण बदलले नाही. त्यामुळे खासगी कारखाने वाढले. ऊस हे पैसे देणारे पीक असल्याने शेतकरी त्याकडे वळतात. दुर्दैवाने दुसऱ्या पिकांत पैसे मिळत नाहीत. शेतकऱ्यांना आधारभूत किंमतही दिली जात नाही. अवकाळी पाऊस आल्यास शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. खुले आर्थिक धोरण आल्यामुळे स्पर्धा वाढली. आता ग्राहकाला ऊस, दूध किफायतशीर किमतीत कसे मिळेल, हे पाहिले पाहिजे. पुणे व सातारा या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका सहकारात चांगले काम करत आहेत. नेतृत्व चांगले पाहिजे. संस्था चांगल्या चालविल्या पाहिजेत. स्पर्धेचे युग असल्याने सहकार व खासगी कारखानदारी या दोघांना स्पर्धेत टिकावे लागणार आहे.

विधिमंडळात सरकारवर टीका करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत तुम्ही ‘सॉफ्ट’ असता, अशी टीका होते. त्यावर तुमचे काय म्हणणे आहे?

फडणवीस यांच्याबाबत मी ‘सॉफ्ट’ नाही. जेवढा विरोध करायचा तेवढा करतो. शरद पवार व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री होती. जेव्हा सभा घ्यायचे त्यावेळी ते एकमेकांवर तुटून पडायचे. यशवंतराव चव्हाण व आचार्य अत्रे एकमेकांवर टीका करायचे परंतु नंतर भेट झाल्यावर आदराने बोलायचे. महाराष्ट्रात राजकारणाला एक परंपरा आहे. ते माझे वैरी नाहीत, त्यांनी माझा बांध रेटलेला नाही.

राज्यात सतत राजकीय अस्थैर्य आहे असे वाटते का?

निश्चितच अस्थैर्य आहे. पूर्वी देशात काँग्रेसची निर्विवाद सत्ता होती. १९७७ मध्ये पहिल्यांदा जनता पक्षाचे सरकार आले. अलीकडच्या काळातील ‘आप’ दिल्ली, पंजाब काबीज करून राष्ट्रीय पक्ष होईल, हे कोणाला माहीत नव्हते. केंद्र सरकार तृणमूल काँग्रेसच्या मागे लागले तरी तिथे ममता बॅनर्जी सत्तेत आल्या. ओडिशात नवीन पटनाईक कायम सत्तेत राहतात. २०१४ व २०१९ च्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजप वाढली. मोदी यांचा करिष्मा चालला. जनतेला वाटले हे चांगले करतील म्हणून त्यांना संधी दिली. पहिल्यांदाच भाजपला पूर्ण बहुमत मिळाले. ही ‘फॅक्ट’ नाकारता येत नाही. पण त्यांच्यानंतर कोण हे नाव सांगता येतं का?

२०२४ च्या निवडणुकीत महाविकास आघाडीची वैचारिक भूमिका काय असेल?

सत्ताधारी पक्षाचा पराभव करण्यासाठी आम्ही विरोधी पक्षांनी मते एकत्र केली पाहिजेत. त्यासाठी वेळप्रसंगी दोन पावले मागेही आले पाहिजे. विरोधी पक्षांची मते विभागली, तर निकाल वेगळा लागतो हे आपण नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीतून पाहिले आहे. चिंचवडमध्ये एकासएक उमेदवार दिला असता, तर येथेही महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला असता. आघाडीतील घटक पक्षांनी ज्याची जागा त्याला देऊन बंडखोरी टाळली पाहिजे.

केंद्रीय संस्थांद्वारे चौकशा सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून होतो. त्यावर तुमचे काय मत आहे?

जनता दूधखुळी नाही. या चौकशा होत असताना विरोधकांबरोबरच सत्ताधारी पक्षातील काही लोकांच्याही चौकशा झाल्या असत्या तर हे पारदर्शकपणे चालले आहे, असे म्हणता आले असते. पण आता लोकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा आहेत. राजकीय आकसातून चौकशा करू नयेत. ही पद्धत मागे नव्हती. खोटे जास्त काळ टिकत नाही. मनात असेल तर जनता बदल करते.

तीन पक्षांच्या प्रवक्त्यांमध्ये एकवाक्यता आहे का?

आमच्या पक्षाची भूमिका आमचे प्रवक्ते मांडतील, असे मी यापूर्वीच सांगितले आहे. बाकीच्यांनी त्यात लुडबूड करण्याचे कारण नाही. पुन्हापुन्हा बोलणे मला मान्य नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com